युवकांना मिळणार स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन
सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मुकुंदनगर मध्ये असलेल्या बडी (जामे) मस्जिदच्या जागेत होतकरु विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या स्टडी सेंटरचे उद्घाटन झाले. मस्जिदच्या जागेतून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळणार असून, या स्टडी सेंटरद्वारे युवकांना भवितव्य घडविता येणार आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना या स्टडी सेंटरमध्ये मोफत प्रवेश घेता येणार आहे. युवकांच्या भविष्याच्या दृष्टीकोनाने राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजात चर्चेचा विषय ठरला आहे.
स्टडी सेंटरच्या उद्घाटनासाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी वसीम सय्यद, आर्किटेक्ट अर्शद शेख, सहाय्यक अभियंता आबिद पठाण, मुदस्सर शेख, दिलावर शेख, डॉ. सईद शेख, हाजी शौकत तांबोळी, आमीर सय्यद, परवेज शेख, ॲड. एस.एम. अन्वर आदींसह आजी-माजी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह परिसरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मस्जिदच्या आवारात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी बनविण्यात आलेली अभ्यासिका जिल्ह्यातील अभिनव उपक्रम ठरला असून, यामध्ये युवकांना विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसण्यासाठी टेबल, खुर्च्या, विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना या स्टडी सेंटरमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

मस्जिदच्या एका हॉलमध्ये स्टडी सेंटर स्थापन करण्याचा निर्णय मस्जिदचे विश्वस्त कादीर सर व अन्य विश्वस्तांनी घेतला. स्टडी सेंटर चालू करण्यामध्ये चाँद सुलताना हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कादीर सर व ॲड. नदीम सय्यद यांनी पुढाकार घेतला आहे. या स्टडी सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश घेता येणार आहे. तर युवकांना करियर मार्गदर्शन करुन शैक्षणिक अडचणीची सोडवणूक करता येणार आहे. या उपक्रमाचे समाजातून स्वागत केले जात आहे.
मस्जिद मध्ये उपलब्ध असलेल्या जागेचा वापर मुलांच्या भवितव्य घडविण्याच्या दृष्टीकोनाने होण्यासाठी पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. शिक्षणाचे महत्त्व समजून विद्यार्थ्यांनी भवितव्य घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचे व स्टडी सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन ॲड. नदीम सय्यद यांनी केले आहे.