शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग व सुरु असलेल्या शाळा पाडल्या बंद
एकच मिशन जुनी पेन्शनच्या घोषणा
अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करावी व इतर 18 मागण्यासाठी गुरुवार पासून (दि.14 डिसेंबर) पुन्हा सुरु झालेल्या संपात सहभाग नोंदवून, अहमदनगर जिल्हा प्राथमिक (खाजगी, जिल्हा परिषद) माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तर समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने विविध ठिकाणी भेटी देऊन सुरु असलेले निपुण भारत संदर्भातील शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग व सुरु असलेल्या शाळा बंद पाडल्या.

सकाळी न्यू आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय येथून मोटारसायकल रॅलीला प्रारंभ झाले. यामध्ये मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित, अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, शिक्षक भारतीचे राज्यसचिव सुनील गाडगे, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे विठ्ठल उरमुडे, शिक्षक परिषदेचे शहराध्यक्ष बाबासाहेब बोडखे,शिरीष टेकाडे, राजेंद्र लांडे, शेखर उंडे, अन्सार शेख, सुनिल गाडगे, प्रसाद शिंदे, समीर पठाण, वैभव सांगळे, प्रसाद सामलेटी, गोवर्धन पांडुळे, अतुल सारसर, भानुदास दळवी, भाऊसाहेब थोटे, सुरज घाटविसावे, सुनिल दानवे, संजय निक्रड, नंदकुमार शितोळे, पै. नाना डोंगरे, घनश्याम सानप, बद्रीनाथ शिंदे, देवीदास पालवे आदी सहभागी झाले होते.
यावेळी जुनी पेन्शनचा व इतर न्याय हक्काच्या मागण्या मिळण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रॅली दिल्लीगेट, चितळे रोड, सर्जेपुरा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. यावेळी सुरु असलेल्या सरकारी-निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या धरणे आंदोलनात रॅलीतील सर्व शिक्षक सहभागी झाले होते.

प्रारंभी सकाळी नगर-कल्याण रोड येथील उध्दव अकॅडमी शाळेत नवीन शैक्षणिक धोरणा संदर्भात सुरु असलेल्या शिक्षकांच्या निपून भारत प्रशिक्षण वर्ग बंद पाडून शिक्षकांना संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तर अनेक ठिकाणच्या शाळांना शिक्षक, शिक्षकेतरांच्या समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने भेट देऊन शाळा बंद केल्या.