विद्यार्थ्यांनी गिरवले उद्योजकता आणि कौशल्य विकासाचे धडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुल संचलित सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि कौशल्य विकास होण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आनंद लुटला.

या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन डॉ. प्रसन्न देवचक्के व उद्योजक जालिंदर कोतकर यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी विश्वस्त दत्ताजी जगताप, ज्ञानेश्वर अंधुरे, प्राचार्य रवींद्र चोभे, मुख्याध्यापक संदीप भोर, मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी, अवि साठे आदींसह सर्व शालेय शिक्षक, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. प्रसन्न देवचक्के म्हणाले की, विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान आवश्यक आहे. जगात टिकायचे असेल तर आलेल्या संकटावर मात करुन पुढे जात रहावे व स्वतः मध्ये बदल करण्याचे त्यांनी सांगितले. या बाल आनंद मेळाव्यात विविध साहित्याचे प्रदर्शन, समाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या, आणि विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान होण्यासाठी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल थाटण्यात आले होते. विविध उद्योगांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. बाल आनंद मेळावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह पालकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी व अनिता क्षीरसागर यांनी केले. आभार शिवाजी मगर यांनी मानले.