जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड व कपिल पवार यांची माहिती
निर्धार, नव्या पर्वाचा घड्याळ तेच वेळ नवी हे संकल्पवादी अभियान राबविण्याचे नियोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर दक्षिण व उत्तर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या कार्यकारिणीचा विस्तार लवकरच करण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात कार्यकारणीच्या माध्यमातून निर्धार, नव्या पर्वाचा घड्याळ तेच वेळ नवी हे संकल्पवादी अभियान राबविले जाणार असल्याची माहिती दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड व उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी दिली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रांतध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पक्षाचे ध्येय, धोरण पोहचवून पक्ष वाढीसाठी कार्यकारणीचा विस्तार केला जाणार आहे. तर सर्वसामान्य मतदार जोडणीवर भर देण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.
पक्षीय पदाचे विकेंद्रीकरण करून सर्व आघाड्या, सेल यांची लवकरात लवकर नियुक्ती करण्यात येणार आहे. पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ही कार्यकारणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शासन पातळीवरील घेतले गेलेले सर्व महत्त्वपूर्ण निर्णय या कार्यकारणीच्या माध्यमातून सर्व समाज घटकापर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. या कार्यकारिणीमध्ये जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी, युवक, युवती कार्यकारणी, महिला आघाडी कार्यकारणी, सोशल मीडिया कार्यकारणी, विविध सेलचे प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे गायकवाड व पवार यांनी सांगितले आहे.
जे मतदार संघ राष्ट्रवादीकडे आहेत, त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. इतर विधानसभा मतदारसंघासाठी विशेष रणनीती आखली जाणार आहे. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा विचार करता या निवडी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते, स्थानिक विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी यांच्याशी विचारविनिमय करून या कार्यकारिणीची निवड केली जाणार असल्याचे गायकवाड व पवार यांनी स्पष्ट केले आहे.