समाजाला दिशा देणारे बाबासाहेबांचे विचार म्हणजे क्रांतीची जननी -एन.एम. पवळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, राज्य उपाध्यक्ष वसंतराव थोरात, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे, श्याम थोरात, शहराध्यक्ष श्याम गोडळकर, अभियंता निखील पठारे, हर्षल काकडे, राहुल गलांडे, पवन फाटके, सुदाम जाधव आदी उपस्थित होते.
राज्याध्यक्ष एन.एम. पवळे म्हणाले की, भारतीय लोकांना समता बंधुता मिळवून देणारी राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. राज्यघटनेमुळे देशात समता, बंधुता नांदत आहे. बाबासाहेबांनी अन्याया विरोधात दिलेला लढा कायम स्फूर्ती देणारा आहे. त्यांच्या विचाराने समाजाला दिशा मिळणार असून, त्यांचे विचार म्हणजे क्रांतीची जननी होय. असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष के.के. जाधव यांनी तत्कालीन व्यवस्थेविरोधात संघर्ष करून बाबासाहेबांनी दीन-दलितांचा उद्धार केला. शोषितांचा आवाज बुलंद करुन जातिव्यवस्थेने बरबटलेल्या काळोखात बाबासाहेबांनी समाजाला प्रकाशवाट दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले.