बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर वेधले शासनाचे लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुंबई येथील दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या उपोषणात रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, गुलाम शेख, संदीप वाघचौरे, संतोष पाडळे, अमोल खरात, नईम शेख, सुधीर गायकवाड, राजेश शिंदे, विनीत पाडळे, अनिकेत पवार, निशांत शेख, मुन्ना भिंगारदिवे, महिला शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार आदी सहभागी झाले होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ असलेले दादर (मुंबई) येथील चैत्यभूमी समस्त आंबेडकर समाजाचे ऊर्जा स्थान आहे. देशातील समस्त आंबेडकरी जनता व बौध्द अनुयायांचे हे एक श्रध्दास्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबर रोजी या चैत्यभूमीवर दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. या स्मारक स्थळाला महाराष्ट्र शासनाने अ वर्ग पर्यटन स्थळ व तीर्थ स्थळाचा दर्जा 2 डिसेंबर 2016 रोजी दिला आहे. दादर परिसर चैत्यभूमीच्या नावाने ओळखला जात असून, दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याचे संपूर्ण आंबेडकरी जनतेची मागणी असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले.
या नामांतरासाठी अनेकदा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे. मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. मुंबई येथील दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याचा निर्णय तातडीने घेण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने उपोषण करण्यात आले.