सावली दिव्यांग संघटनेचा उपक्रम
तळागाळातील दिव्यांगापर्यंत शासकीय योजना पोहचवण्याचे सावली दिव्यांग संघटनेचे कार्य कौतुकास्पद -नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांना आवश्यक ती मदत करण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सावली दिव्यांग संघटनेचा कायमच पुढाकार राहिला आहे. तळागाळातील दिव्यांगापर्यंत शासकीय योजना पोहचवण्याचे सावली दिव्यांग संघटनेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथील गरजू दिव्यांग बांधव कैलास काळे याला सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने व्हिलचेअर भेट देण्यात आली. यावेळी डोंगरे बोलत होते. याप्रसंगी सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, बाहुबली वायकर, छबू काळे, मयुर काळे, संदीप आंग्रे, गोपी पाचारणे, दिपक जाधव, अर्जुन काळे, विशाल काळे, गणेश अंधारे, पै. संदीप डोंगरे, संजय काळे, निवृत्ती फलके, दिलीप काळे, विजयकांत पाचारणे, बाळासाहेब काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे डोंगरे म्हणाले की, दिव्यांगासाठी असणाऱ्या शासकीय योजना खेडयापाडयातील दुर्गम भागात पोहोचवण्यास शासकीय यंत्रणा कमी पडत असल्यामुळे आजही कित्येक दिव्यांग बांधव शासनाच्या वेगवेगळया योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित आहेत. अशा ग्रामीण भागातील गरजवंत दिव्यांगाचा शोध घेऊन सावली दिव्यांग संघटना त्यांना प्रवाहात आणण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
बाबासाहेब महापुरे यांनी दिव्यांग दिनाचे महत्व सांगून दिव्यांगानी खचून न जाता स्वत:च्या पायावर उभे रहावे. जीवनात अशक्य काहीच नसून, प्रयत्न करण्याची गरज आहे. दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी सावली दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. दिव्यांगांना शासकिय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.