पालक शिक्षक संघाचा उपक्रम
विद्यार्थ्यांनी असमस्यांना तोंड देऊन सकारात्मक विचार ठेवावा -शशिकांत नजान
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालक शिक्षक संघाच्या वतीने गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
बाल दिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपप्राचार्य रावसाहेब बाबर तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शशिकांत नजान, सहसचिव ज्योती रामदिन उपस्थित होते. भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित नेहरूंच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयातील जेष्ठ अध्यापक वैभव पडोळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय रमेश भोसले यांनी करुन दिला.

शशिकांत नजान म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आलेल्या समस्यांना तोंड देऊन सकारात्मक विचार ठेवावा. शिक्षणाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे व तरुणांमुळे भारताचे भविष्य उज्वल असल्याचे त्यांनी सांगितले.
उपप्राचार्य रावसाहेब बाबर म्हणाले की, यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अंगी जिद्द, हातोटी, चिकाटी, आत्मविश्वास व वक्तशीरपणा अंगी बाळगावा. आजचे विद्यार्थी उद्याचा सक्षम भारत घडविणार असून, त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यालयातील इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनी योगिता दैठणकर हिने पंडित नेहरू यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी पर्यवेक्षिका आशा सातपुते, पर्यवेक्षक विष्णू गिरी, बाळू वाव्हळ आदींसह शालेय शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा कमलकर व रोहिणी शेळके यांनी केले. आभार राजलक्ष्मी कुलकर्णी यांनी मानले. विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश केदारे, सचिन पवार, कैलास करपे, अरविंद आचार्य, बाबासाहेब पटारे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संयोजन शोभा पालवे यांनी केले.