महात्मा फुले पुण्यतिथीचा सामाजिक उपक्रम
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाने समाजाला दिशा दिली -इंजि. केतन क्षीरसागर
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथील भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी घेतलेल्या कार्यक्रमात वसतिगृहातील गरजू घटकातील मुलींसाठी अन्न-धान्याची मदत देऊन त्यांना शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी गौरव हरबा, केतन ढवण, आशुतोष पाणमाळकर, ऋषीकेश जगताप, कृष्णा शेळके, तन्वीर मणियार, ओंकार मिसाळ, कुणाल ससाणे, ओंकार म्हसे, रोहित सरना, मंगेश शिंदे, ओंकार गोडाळकर, शिवम कराळे आदी उपस्थित होते.
इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, आर्थिक दुर्बल घटकातील मुली वसतिगृहात राहून शिक्षणाने आपले भवितव्य घडवित आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाने समाजाला दिशा दिली. आज विविध क्षेत्रात महिला आघाडीवर असून, याचे श्रेय फुले दांम्पत्यांना जाते. परिस्थितीशी संघर्ष करुन शिक्षणाने भवितव्य घडविणाऱ्या मुलींसाठी राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून आधार देऊन महात्मा फुलेंच्या विचाराने उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
गरजू घटकातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे भीमा गौतमी वसतिगृहाच्या वतीने आभार मानण्यात आले.