पाण्याच्या टाकीला दगड मारल्याचा जाब विचारल्याने केले वार
अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्याने येता-जाता घराकडे पाहतो म्हणून, तर पाण्याच्या टाकीला दगड मारून नुकसान केल्याचा जाब विचारल्याने एका वृद्धावर तलवारीने हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.25 नोव्हेंबर) सावेडी राजवाडा येथे घडली. या हल्ल्यात विलास दयानंद भिंगारदिवे (वय 68, रा. राजवाडा सावेडीगाव) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी झालेले भिंगारदिवे यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबदावरून हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव कैलास जाधव (रा. सावेडीगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भिंगारदिवे यांच्या घराकडे जाण्या-येण्यासाठी जाधव यांच्या घरासमोरून सार्वजनिक रस्ता आहे. रस्त्याने जाता-येता घराकडे का पाहतो? असे म्हणून ऑगस्ट महिन्यात जाधव यांनी भिंगारदिवे यांना शिवीगाळ केली होती. त्यावेळी भिंगारदिवे यांनी पोलिसात तक्रार न देता आपसात वाद मिटून घेतला होता.
दरम्यान शनिवारी सकाळी जाधव यांनी भिंगारदिवे यांच्या घरासमोरील पाण्याच्या टाकीला दगड मारून नुकसान केले. भिंगारदिवे यांनी त्याला जाब विचारला असता त्याने तलवारीने हल्ला केला. हल्ल्यात भिंगारदिवे गंभीर जखमी झाले आहेत. भिंगारदिवे यांनी आरडाओरडा केला असता त्यांच्या घरातील दोन महिला सोडविण्यासाठी आले असता जाधव यांनी त्यांना देखील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
