जाती-धर्मात द्वेष पसरत असताना महात्मा फुले यांचे समतेचे विचार समाजाला दिशादर्शक -लक्ष्मणराव ठोकळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- कामरगाव (ता. नगर) येथे क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्था आणि माळी महासंघाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. गावात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी लक्ष्मणराव ठोकळ पाटील, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, ह.भ.प. बापू माऊली, गोरख ठोकळ, नितीन झरेकर, शेळके, शशीकांत ठोकळ, भानुदास ठोकळ, बलभीम ठोकळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
लक्ष्मणराव ठोकळ पाटील म्हणाले की, जाती-धर्मात द्वेष पसरत असताना महात्मा फुले यांचे समतेचे विचार समाजाला दिशादर्शक आहे. महात्मा फुले यांनी समतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली. समाजात समता आणि रुढी, परंपरा दूर होण्यासाठी त्यांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून समाजात क्रांती घडवली असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश बनकर म्हणाले की, महात्मा फुले यांनी त्याकाळात परिस्थितीशी संघर्ष करुन समाजसुधारणेचे कार्य केले. शेतकरी, महिला व बहुजन समाजाला सन्मान मिळण्यासाठी त्यांनी शिक्षणाने क्रांती घडवली. छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी मानून त्यांनी आधुनिक व क्रांतिकारी विचारांनी पुरोगामी महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने पायाभरणी केल्याचे त्यांनी सांगितले.