उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक देवळाणकर यांचे आदेश
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने या प्रश्नावर वेधले होते लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयोगशाळा सहाय्यक, सहायक ग्रंथपाल व परिचर यांची सातव्या वेतन आयोगातील कालबद्ध पदोन्नती व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देताना आणि वेतन निश्चिती करतांना सर्व विभागीयस्तरावर त्रुटी दूर करून एकसारखी सुसूत्रता आणून वेतनात लाभ देण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य (पुणे) चे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव संतोष कानडे यांनी दिली.
नुकतेच सर्व विभागीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी, लेखाधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पुणे येथे झाली. यावेळी देवळाणकर यांनी आदेश दिले आहेत. यावेळी सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, प्रशासन अधिकारी सुयश दुसाने, डॉ.अर्चना बोराडे, लेखाधिकारी शिवाजी ठोंबरे ,महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश म्हसे, महासचिव रावसाहेब त्रिभुवन, संजय झेंडे, संदिप हिवरकर, गोपाल सोनावणे, संतोष कानडे,राजन शिंदे, मारुती धोत्रे, प्रविण पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

महाविद्यालयीन प्रयोगशाळा सहायक, परिचर व सहायक ग्रंथपाल, परिचर पदाच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन निश्चिती करतांना महाराष्ट्रातील सर्व विभागीय सहसंचालक स्तरावर विविधता होत असून, वेगवेगळ्या वेतनश्रेणीत निश्चिती केल्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी यांनी लेखी निवेदन देऊन संचालक डॉ. देवळाणकर यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या प्रश्नावर झालेल्या बैठकीत त्यांनी सदर प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ देवळाणकर म्हणाले की, शिक्षकेतर कर्मचारी उच्च शिक्षणातील महत्त्वाचा घटक असून, व्यवस्थेचा कणा आहे. शासनस्तरावरील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेऊन प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. तसेच यावेळी प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील कर्मचारी कै. दिलीप शिंदे यांचा मुलगा निरंजन शिंदे यांना अनुकंपा तत्त्वावर रुजू करण्याबाबतचे आदेश संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.