नगरसेवकांनी दर्जेदार काम होण्यासाठी रस्त्याची केली पहाणी
खड्डेमय शहराची ओळख पुसण्याचे काम नव्याने होत असलेल्या रस्त्यांमुळे होणार -पै. सुभाष लोंढे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे. प्रभागात विकास कामांसह प्रलंबीत प्रश्न सोडविण्यात येत आहे. खासदार विखे यांच्याकडे पाठपुरावा करुन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला आहे. कामे करताना त्याचा दर्जा देखील चांगला राहण्यासाठी प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. खड्डेमय शहराची ओळख पुसण्याचे काम नव्याने होत असलेल्या रस्त्यांमुळे होणार आहे. इतर प्रास्तावित रस्त्यांचे कामे देखील मार्गी लावून नागरिकांना चांगले रस्ते उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन नगरसेवक पै. सुभाष लोंढे यांनी केले.
शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून तर प्रभागातील नगरसेवक यांच्या पाठपुराव्याने होत असलेल्या चौपाटी कारंजा ते आनंदी बाजार चौक रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमीपूजन ज्येष्ठ नागरिक प्रा. देवेंद्र कवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक लोंढे बोलत होते. याप्रसंगी नगरसेविका सोनाली चितळे, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे, माजी नगरसेवक किशोर डागवाले, आकाश लोणकर, अजय चितळे, संतोष शिंदे, गजेंद्र कवडे, मनोज लोंढे, डॉ. अंकुश सुद्रिक, अनिकेत पाटोळे, अमोल भंडारी, स्वप्निल बाथरे, अनिकेत पाटोळे, भूषण भागवत, सागर शिंदे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सोनाली चितळे म्हणाल्या की, नागरिकांना सोयी-सुविधा देण्याचा विकासात्मक दृष्टीकोन समोर ठेऊन कार्य सुरु आहे. चौपाटी कारंजा ते आनंदी बाजार चौक दरम्यान शालेय विद्यार्थी, महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. या नवीन रस्त्यामुळे नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गणेश कवडे म्हणाले की, खासदार विखे यांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध होत आहे. दर्जेदार विकासात्मक कार्य होण्यासाठी प्रभागातील नगरसेवक कटिबध्द असून, विकास कामे मार्गी लावण्याचे सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवकांनी रस्त्याच्या कामाची पहाणी करुन, संबंधित ठेकेदाराला रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला राखण्याबद्दल सूचना केल्या.
