दिव्यांगांना सोयीसुविधा मिळण्याची मागणी
सामाजिक न्याय भवनामध्ये दिव्यांगांची परवड होत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात नव्याने झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या इमारतीमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी सोयीसुविधा देण्याच्या मागणीसाठी सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय भवन येथे उपोषण करण्यात आले. या उपोषणात संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, चांद शेख, बाहुबली वायकर, बाबासाहेब डोळस, अरूण गवळी, सुनिल वाळके, सरोजीनी गांगुर्डे, निर्मला भालेकर, शारदा गवळी, रोहीणी करांडे आदी दिव्यांग बांधव व महिला सहभागी झाल्या होत्या.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार सर्व सार्वजनिक इमारती व ठिकाणामध्ये दिव्यांगांसाठी मुक्त संचार करण्याच्या दृष्टीने अडथळा विरहित वातावरण निर्मीती करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. त्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहे. परंतु शहरात नव्याने झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या इमारतीमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी सोयीसुविधा देण्यात आलेली नाही. या इमारतीमध्ये दिव्यांगासाठी लिफ्ट, फुटपाथ, रॅम्प, रेलींग, व्हिलचेअरची व्यवस्था उपलब्ध नाही. दिव्यांगासाठी आधुनिक पध्दतीचे स्वतंत्र शौचालय, दृष्टीहीन दिव्यांगासाठी सेन्सर फरशा बसविण्यात आलेल्या नाहीत. ही सुविधा उपलब्ध नसल्याने या कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्या दिव्यांगांची परवड सुरु आहे. याबाबत संघटनेने संबंधित विभागाला वेळोवेळी निवेदन व पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
सामाजिक न्याय विभाग म्हणजे गोर-गरीब दिव्यांग यांच्यासाठी काम करणारे न्याय भवन आहे. या विभागाकडूनच दिव्यांगावार अन्याय होत असेल, तर दिव्यांगांनी न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी उपस्थित केला आहे. तर सदरची इमारत पूर्णत्वाकडे असतानाच या सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीकडे दुर्लक्ष करुन अधिकाऱ्यांनी स्वत:चे कार्यालय चकचकीत करुन घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी दिव्यांगासाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन न दिल्यास आजपासून अन्न त्याग व उद्यापासून पाण्याचा देखील त्याग करून दिव्यांगांचा प्रश्न सुटत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचा इशारा महापुरे यांनी दिला आहे.