• Tue. Jul 22nd, 2025

भाजप सरकार हटाव देश बचाव राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा 30 नोव्हेंबरला शहरात

ByMirror

Nov 18, 2023

भाकप व आयटकच्या संपर्क कार्यालयात बैठकीत स्वागताचे नियोजन

जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कामगार व भाजप विरोधी समविचारी पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र (आयटक) च्या वतीने शाहू महाराजांचे जन्मगाव कोल्हापूर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी नागपूर दरम्यान काढण्यात येणारी जनविरोधी भाजप सरकार हटाव देश बचाव राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा 30 नोव्हेंबरला शहरात येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बुरुडगाव रोड येथील भाकप व आयटकच्या संपर्क कार्यालयात बैठक पार पडली. आयटकचे राज्य सचिव श्‍याम काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी आयटकचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, कॉ. विनोद झोडगे आदी उपस्थित होते.


20 नोव्हेंबर 18 डिसेंबर दरम्यान आयटकच्या वतीने राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा निघणार आहे. ही यात्रा 30 नोव्हेंबरला अहमदनगर शहरात दाखल होणार असून, यामध्ये मोठ्या संख्येने कामगार वर्ग व भाजप विरोधातील समविचारी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे या बैठकीत नियोजन करण्यात आले. तर 18 डिसेंबर रोजी सरकारच्या कामगार, कर्मचारी, शिक्षक, शेतकरी व जनविरोधी धोरणाच्या विरोधात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून सरकारला चले जावचा इशारा दिला जाणार आहे.


कॉ. ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, केंद्रात व राज्यात सरकारने कामगार विरोधी धोरण राबवून भांडवलशाहीला खतपाणी घातले आहे. कामगारांचे न्याय, हक्क पायदळी तुडवण्याचे काम सुरू आहे. कामगार वाचला तर देश वाचणार आहे. अन्यथा देशात हुकुमशाही अस्तित्वात येणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन या विरोधात संघर्ष करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, या यात्रेच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तर शहरात येणाऱ्या जनजागरण संघर्ष यात्रेत मोठ्या संख्येने सर्व क्षेत्रातील कामगार वर्ग सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


श्‍याम काळे म्हणाले की, आयटक ही देशातील पहिली कामगारांची संघटना असून, त्यांच्या न्याय, हक्कासाठी संघर्ष करीत आहे. जनविरोधी धोरण राबविणाऱ्या केंद्र व राज्य सरकारला चले जावचा इशारा देण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे. या सरकार विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. नवीन कामगार कायदे आणण्याचा घाट केंद्र सरकारने घातला असून, यामुळे कामगार मालकांच्या दावणीला बांधले जाणार आहे. तसेच कंत्राटीकरणामुळे कामगारांचे हक्क हिरावले जात आहे. कामगार, शेतकरी व सर्वसामान्यांच्या जनहितार्थ हा संघर्ष असून सर्वांनी या संघर्षात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *