आरोपीच्या भेटसाठी कोणताही बनावट आधार कार्ड किंवा माहिती लपवली नसल्याचा येवलेचा खुलासा
आरोपीच्या भेटीसाठी पैसे दिल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील ओमकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील आरोपींना भेटण्यासाठी कारागृहात बनावट आधार कार्ड वापरल्याप्रकरणी अमोल भाऊसाहेब येवले यांच्यावर कोतवाली पोलीस स्टेशनला कारागृहातील तुरुंग अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र येवले यांनी कोणत्याही प्रकारची माहिती न लपवता व खरे आधार कार्ड दाखवून आर्थिक देवाण-घेवाण केल्यानंतरच आरोपीची भेट घेतल्याची कबुली दिल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. तर स्वत:वर ओढवलेली नामुष्की झटकण्यासाठी तुरुंग अधिकारी यांनी माझी बदनामी करुन खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप येवले यांनी केला असून, या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व कारागृह अधीक्षकांकडे केली आहे.
अहमदनगर जिल्हा (सबजेल) कारागृहात येवले आरोपींना भेटण्यासाठी खोट्या आधारकार्डचा आधार घेत असल्याची तक्रार मयताचे वडिल पांडुरंग भागानगरे यांनी केली होती. हे प्रकरण चव्हाट्यावर आले असताना तुरुंग अधिकारी यांनी शेवटी गुन्हा दाखल केला. मात्र अमोल येवले यांच्या या खुलाशानंतर अरोपीच्या भेटीला आर्थिक देवाण-घेवाणची किनार मिळाली असल्याचे समोर येत आहे.
अमोल येवले यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, गणेश केरप्पा हुच्चे यांच्याकडे मागील दहा वर्षापासून बँकेशी संदर्भात काम करत आहे. सबजेल कारागृहात खून प्रकरणात न्यायालयीन कोठडित असलेले गणेश हुच्चे यांना भेटण्यासाठी त्यांच्या वरोवृध्द वडिल केरप्पा हुच्चे यांना मुलाखतीला घेऊन जात असे. बाहेर उभा असताना जेल मधील एक अधिकारी याने काही देणे घेणे होत असेल तुला पण आत सोडण्याचे सांगितले. बऱ्याच दिवसापासून गणेश हुच्चे यांच्याशी बोललो नसल्याने व काही बँके संदर्भात काम असल्याने त्या अधिकारीला पैसे देण्याचे कबुल केले. त्या अधिकाऱ्याने एका महिला अधिकाऱ्याला विचारुन सांगतो, असे उत्तर दिले. त्यानंतर माझी गणेश हुच्चे यांच्याशी मुलाखत घडवून आनली. त्या मोबदल्यात वेळोवेळी त्या व्यक्तीला झारेकर गल्ली येथे रोख रकमा देण्यात आल्या. दुसऱ्यांदा देखील त्या महिला अधिकारीच्या परवानगीवरुन आरोपीची भेट घडविण्यात आली. वेळोवेळी फोन करुन त्या अधिकाऱ्याने पैश्याची मागणी केली व त्यानुसार पैसे देण्यात आले.
आरोपीची भेट घेताना मी त्यांचा नातेवाईक नसल्याची पूर्वकल्पना कारागृहाच्या अधिकाऱ्यांना होती. मात्र मी कोणत्याही प्रकारे बनावट आधार कार्ड दाखवून कारागृहात भेटीला गेलो नाही. मुलाखत कक्षेच्या रजिस्टरवर कोणत्या नावाने एन्ट्री केली जाते, हे देखील मला माहीत नव्हते, माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने हा प्रकार लक्षात आला असल्याचे यांनी स्पष्ट केले आहे. तर कारागृहातील मुलाखतीचा प्रकार दडपण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले असून, या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी येवले यांनी केली आहे.
