• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

अशोकभाऊ फिरोदियात रंगली उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा

ByMirror

Sep 16, 2023

सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलने पटकाविला सांघिक फिरता करंडक

ऐन वेळेस मिळालेल्या विषयांवर बोलते झाले विद्यार्थी

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. संस्थेचे संस्थापक स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. या वर्षी देखील स्पर्धेत सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलने स्पर्धेचा सांघिक फिरता करंडक पटकाविला.


दरवर्षी घेतली जाणारी उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रमुख आकर्षण ठरली. स्पर्धकांना ऐन वेळेस विषय देऊन त्यावर विचार मांडण्यास सांगण्यात आले होते. अशोकभाऊ फिरोदिया शाळेच्या सभागृहात प्रारंभी स्पर्धेचे उद्घाटन स्व. अशोकभाऊ फिरोदिया व स्व. शांतीकुमारजी फिरोदिया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून शोभना गायकवाड व राजेंद्र देवडे उपस्थित होते.


मनिष कांबळे यांनी स्पर्धेसाठी विविध विषयांचा समावेश असून, स्पर्धकाने स्वत: चिठ्ठी काढून त्या विषयावर बोलण्याचे स्पष्ट करुन स्पर्धेची माहिती दिली. रेणुका पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. रविंद्र उजागरे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सल्लागार समितीचे सदस्य भूषण भंडारी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.


शोभना गायकवाड म्हणाल्या की, वाचनाने विचार समृध्द होतात. वाचनाने मनुष्याच्या जीवनाला दिशा मिळत असते. यासाठी विद्यार्थ्यांनी यशस्वी व्यक्ती, महापुरुषांचे आत्मचरित्र व चांगली पुस्तके वाचण्याचे आवाहन केले. राजेंद्र देवडे यांनी विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व गुण विकसीत करण्यासाठी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेचे कौतुक केले.


विविध विषयांवर रंगलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मनमोकळे आपल्या भावना मांडल्या. स्पर्धा संपल्यावर निकाल जाहीर करुन बक्षिस वितरण करण्यात आले. बक्षिस वितरणाप्रसंगी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, विश्‍वस्त सुनंदाताई भालेराव, सल्लागार समिती सदस्य भूषण भंडारी, प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, विभाग प्रमुख वैशाली वाघ, रेखा शर्मा उपस्थित होते.


या स्पर्धेत प्रथम क्रमांक- प्रणाली बाबासाहेब कडूस (श्रीराम कृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल) द्वितीय क्रमांक- अलविना जायमोन (सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल), तृतीय क्रमांक- श्रेयस शास्त्री (ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल), उत्तेजनार्थ- ओजस कुलकर्णी (भाऊसाहेब फिरोदिया), अंकिता जवादे (साईनाथ माध्यमिक विद्यालय, शिर्डी) यांनी बक्षिसं पटकाविली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष कांबळे यांनी केले. आभार विशाल गोहेर यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व अध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *