निमगाव वाघा सारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य कौतुकास्पद -माधवराव लामखडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास निंबळकचे माजी सरपंच कै. विलासराव लामखडे यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते दत्तू (राजू) रोकडे यांनी शिवाजी महाराजांची मुर्ती भेट दिली. वाचनालयाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी सदर मुर्तीचा स्विकार केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे, उद्योजक रमाकांत गाडे, निमगाव वाघाचे माजी सरपंच साहेबराव बोडखे, निंबळकचे सरपंच प्रियंका लामखडे, उद्योजक अजय लामखडे, केतन लामखडे, मधुकर रोहोकले, भरत ठाणगे, प्राचार्य शिवाजी घाडगे, ह.भ.प. निकम महाराज, ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे, भाऊसाहेब कोतकर, काशीनाथ पळसकर, भरत बोडखे, घनश्याम म्हस्के, सतीश गवळी, सुनिल जाजगे, जयराम खेडकर, बी.एम. कोतकर, प्रशांत जाधव, भागचंद जाधव आदी उपस्थित होते.
माधवराव लामखडे म्हणाले की, निमगाव वाघा सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावण्यासाठी व स्पर्धा परीक्षांचे पुस्तके उपलब्ध होण्याकरिता धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचे कार्य दीशादर्शक ठरत आहे. वाचनालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी डोंगरे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. पै. नाना डोंगरे यांनी ग्रामीण भागात वाचनाची चळवळ बहरण्यासाठी व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी वाचनालय सुरु करण्यात आले आहे. लवकरच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनवर तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान देखील आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले.