सामाजिक संघटनांचा पुढाकार
नागरी सुविधा मिळण्याची शाश्वती राहिली नसल्याने, होणार जन आक्रोश -ॲड. कारभारी गवळी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या महापालिकेला नागरिकांकडून कोट्यावधी रुपयाचे उत्पन्न मिळून देखील नागरी सुविधा मिळत नसल्याने इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटना, भारतीय जनसंसद, पीपल्स हेल्पलाईन आणि भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने महापालिकेचा सूर्यनामा करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संघटना व नागरिकांना बरोबर घेऊन हे आंदोलन केले जाणार आहे.

महापालिकेचे वार्षिक उत्पन्न कोट्यवधी रुपयांचे आहे. परंतु शहरातील बहुतांश रस्ते खड्ड्यांनी व्यापलेले आहे. सगळीकडे कचरा, दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव आहे. शहरातील नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळत नाही. महापालिकेच्या कोट्यावधी रुपयांच्या इमारतींची दुरावास्था झालेली आहे. त्याशिवाय अमरधाम परिसरामध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नागरी सुविधा मिळण्याची शाश्वती राहिली नसल्याने, जन आक्रोशद्वारे सर्व प्रश्नांवर सूर्यनामा आंदोलन केला जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
आंदोलनात नागरिकांच्या वतीने महापालिका आयुक्त व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. या आंदोलनाची तयारी सुरु असून, लवकरच हे आंदोलन केले जाणार असल्याचे प्रकाश थोरात यांनी म्हंटले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत मतदार आपली मते विकतात आणि त्यातून निवडून आलेले भ्रष्ट नगरसेवक फक्त टक्केवारीवर कामे करतात. त्यामुळे वर्षानुवर्षे महापालिका टक्केवारीचा अड्डा बनलेला आहे. सामान्य माणसांचा आवाज संघटित नसल्यामुळे आणि राज्य सरकारमध्ये भ्रष्ट आणि दलबदलू मंत्र्यांचा भरणा झाल्यामुळे लोकशाही पूर्णपणे किडली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भारत मातेचा जयघोष करणारे आतून भ्रष्टपणाने पूर्णपणे बरबटलेले आहेत. नागरिकांनी देखील संघटितपणे या क्रांती मार्गाचा अवलंब करुन सूर्यनामा आंदोलनात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी ॲड. गवळी, थोरात, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, सुधीर भद्रे, अर्शद शेख, कॉ. महेबुब सय्यद, ओम कदम आदी प्रयत्नशील आहे.
