महापालिकेत इतर पक्षाच्या कुबड्या न घेता भाजपची स्वबळावर सत्ता निर्माण केली जाणार -ॲड. अभय आगरकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात भाजप पक्षाला अधिक बळकट करून महापालिकेत इतर पक्षाच्या कुबड्या न घेता स्वबळावर सत्ता निर्माण केली जाणार आहे. ज्या नागरिकांनी भाजप पक्षावर विश्वास टाकला आहे, त्यांची प्रश्न सोडविण्यासाठी दर आठवड्याला प्रत्येक प्रभागात जनता दरबार राबविणार असल्याचे सुतोवाच नुकतेच नव्याने नियुक्त झालेले भाजपचे शहराध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी केले.
गांधी मैदान येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत केडगाव भाजपच्या वतीने नगरसेविका गौरीताई ननावरे व सामाजिक कार्यकर्ते गणेश ननावरे यांनी भाजपच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आगरकर यांचा सत्कार केला. बैठकीला संबोधित करताना आगरकर बोलत होते. यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी शहराध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे, बाबासाहेब वाकळे, तुषार पोटे, उदय अनभुले, महेश नामदे, बाबासाहेब सानप, अनिल गट्टाणी, विशाल खैरे, रविंद्र बारस्कर, बाळासाहेब भुजबळ, एम.डी. मैड, आर.एम. मैड, सुजाता औटी, ज्योती दांडगे, कुसुम शेलार, श्वेता झोंड, रणुका करंदिकर, मयुर ताठे, प्रशांत मुथा, संपतराव नलावडे, पियुष जग्गी, विलास नंदी आदी उपस्थित होते.
पुढे आगरकर म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्ष एक कुटुंब असून, पार्टीचे ध्येय धोरण राबवण्यासाठी एकसंघ राहून पुढील वाटचाल केली जाणार आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील पक्षासाठी आपण किती वेळ देतो हे आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे. कार्यकर्त्यांनी फक्त दोन तास पक्षासाठी द्यावे. महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवून दाखवू. कार्यकर्ते व युवकांचे भविष्य पक्षाशी जोडले गेलेले असून, पक्षासाठी त्यांनी योगदान देऊन पक्ष वाढविण्याचे त्यांनी आवाहन केले.
नगरसेविका गौरीताई ननावरे यांनी केडगाव भाजप देखील एकसंघपणे शहराच्या पाठिशी उभी राहणार आहे. पक्ष वाढीसाठी केडगावात देखील प्रयत्न सुरु आहे. भाजपची स्वबळावर सत्ता आल्यास केडगाव भागातील अनेक प्रलंबीत प्रश्न मार्गी लावता येणार असल्याचे स्पष्ट करुन, शहराध्यक्ष आगरकर यांच्या अनुभवाचा चांगला फायदा पक्षाला होऊन एकजुटीने काम करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी शहराध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे यांनी नवीन कार्यकारणी करताना जुने व नव्यांचा मेळ घालून होणार आहे. शहर छोटे असल्याने पक्षातील कोण-कोणाकडे जातो? हे लवकर लक्षात येते. एकनिष्ठेने पक्षाचे काम केल्यास पक्षाच्या ताकतीवर आगामी महापौर भाजपचा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनव कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत ओरीजनल भाजपचा चेहराच आमदार व्हावा, सुसज्ज हायटेक कार्यालयासाठी जागा पहाणे, एकनिष्ठपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी आदी पक्ष संघटनात्मक बाबींवर उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी नवनिर्वाचित उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचा देखील सत्कार करण्यात आला. बैठकीसाठी शहरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.