अक्षय भालेरावच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी
आरोपींना फाशी देऊन भालेराव कुटुंबीयांचे पुनर्वसन व्हावे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात जातीय अत्याचारा मध्ये झालेली वाढ व अक्षय भालेराव खून प्रकरणी राज्य सरकारचा निषेध नोंदवित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने शहराच्या मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मुंडन करण्यात आले. रिपाईच्या पदाधिकार्यांनी मुंडन करीत सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलन सुरु करण्यात आले. या आंदोलनात रिपाईचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, गुलाम शेख, पवन भिंगारदिवे, संतोष पाडळे, संदीप वाघचौरे, विजय शिरसाठ, जावेद सय्यद, भिम वाघचौरे, नईम शेख, जमीर इनामदार, निजाम शेख, सुफीयान शेख, आवेज काझी, बंटी बागवान, जमीर सय्यद, राकेश चक्रनारायण, हुसेन चौधरी, आदिल शेख, इम्रान शेख, अरबाज शेख, मुन्ना भिंगारदिवे, प्रकाश भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी व युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जातीयवादी प्रवृत्तीतून बोंडार हवेली (जि. नांदेड) येथील अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील नियुक्त करावा व या घटनेचा प्रमुख सूत्रधार शोधण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली.
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजावर जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावात साजरी केल्याचा राग मनात धरून अक्षय भालेराव या युवकाची हत्या करण्यात आली. जातीय द्वेषातून ही हत्या झाली आहे. दुर्देवी घटना घडली असताना देखील मुख्यमंत्री व गृहमंत्रीची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री यांनी याप्रकरणी साधी प्रतिक्रिया देखील दिली नाही. सरकारच्या वागण्यातून जातीयवादी प्रवृत्तींना खतपाणी मिळत असल्याचा आरोप रिपाईच्य वतीने करण्यात आला.
खून झालेल्या अक्षय भालेराव यांच्या कुटूंबियांना शासनाने 50 लाख रुपयाची मदत करून त्या कुटूंबाचे पुनर्वसन करावे, त्या कुटूंबास पोलीस संरक्षण दयावे, कुटबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देऊन त्यांना न्याय मिळावा, हा खटला जलदगती न्यायालयाच चालवण्यासाठी विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.