• Sat. Mar 15th, 2025

देशात लोकशाही विरोधातील भयानक परिस्थिती -प्रा. माणिक विधाते

ByMirror

Jun 4, 2023

एक तास राष्ट्रवादीसाठीच्या बैठकीत देशातील राजकीय परिस्थितीवर ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात लोकशाही विरोधातील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाही विरोधातील संघर्षासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. धर्मांधतेमुळे समाजाची घडी विस्कटत असताना भविष्यातील पिढीचे भवितव्य अंधकारमय बनत चालले आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांची जबाबदारी वाढली असून, देश व लोकशाही रक्षणासाठी जागृक होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केले.


एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत उपमहापौर गणेश भोसले यांच्या प्रभागात बुरुडगाव रोड, विनायक नगर येथील कै. देशपांडेकाका जेष्ठ नागरिक भवन येथे पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा संवाद कार्यक्रम पार पडला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्गदर्शन करताना प्रा. विधाते बोलत होते. यावेळी पी.डी. जपे, आर.डी. मेढे, ज्येष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद जार्वेकर, उपाध्यक्ष सुनिल कोल्हे, भाऊसाहेब म्हस्के, ए.बी. बाबर, वि.रा. राऊत, रविंद्र बोरकर, राष्ट्रवादीचे सरचिटणीस गणेश बोरुडे, रमेश दायमा, भगवान भोंडवे, डी.जी. वांढेकर, मनसुखलाल गांधी, पी.बी. चांडक, मुरलीधर वाघमारे, व्ही.एम. दगडे, एस.बी. कोल्हे आदी उपस्थित होते.


पुढे विधाते यांनी ज्येष्ठ नागरिकांशी सत्ता संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने चूकीच्या पध्दतीने घेण्यात आलेले निर्णय, राज्यपालांनी मांडलेली चुकीची भूमिका, भाजप-शिंदे सरकारकडून नागरिकांमध्ये निर्माण केला जाणारा संभ्रम, नवीन संसदचे उद्घाटन हे एखाद्या राज्याभिषेकाप्रमाणे करुन पंतप्रधानांचा करण्यात आलेला उदो उदो, राष्ट्रपती पद सर्वोच्च असताना संसद भवनाचे उद्घाटनासाठी त्यांनी डावलणे, महिला कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्याचा झालेला प्रयत्न व त्यांना दिल्ली पोलिसांनी दिलेली अमानवी वागणूक, महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील औषध खरेदीचा शंभर कोटीचा घोटाळा, महाराष्ट्राबाहेर उद्योग पळविले जात असताना, नवे उद्योग महाराष्ट्रात आणण्याची केली जाणारी धुळपेक, अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारावर चर्चा करण्यात आली. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.


ज्येष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद जार्वेकर म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहापौर गणेश भोसले यांनी शहरातील आदर्श प्रभाग म्हणून या परिसराचा कायापालट केला. शहराला विकासात्मक व्हिजनने विकास साधला जात असताना, राष्ट्रवादीच्या माध्यमातून विविध प्रभागात बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा व संवाद साधण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *