शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना होणार शैक्षणिक साहित्याचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संस्थेचे सचिव जे.डी. खानदेशे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
यावेळी रेसिडेन्शियल विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे, जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. राजेंद्र जाधव, प्रा. रविंद्र देवढे, जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक प्रा. धनंजय म्हस्के, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव संतोष कानडे, प्रा.दत्तात्रय नकुलवाड आदी उपस्थित होते.
15 जून पासून शाळा सुरु होणार आहे. गरजू घटकातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप केले जाणार आहे. जे.डी. खानदेशे यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाने केले आहे. तर गरजू घटकांना देखील आधार दिला आहे. हीच प्रेरणा घेऊन राबविण्यात आलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.