गृहोद्योग व सामाजिक कार्याची दखल घेऊन मुंबईत झाला सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- गृहोद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणार्या व सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणार्या मीरा बाळासाहेब बेरड यांना हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवराज्याभिषेकाच्या गौरवशाली 350 व्या वर्षानिमित्त मुंबई येथील पत्रकार संघाच्या भवनात हा सोहळा पार पडला.
उद्योजिका संगीता गुरव व अभिनेत्री सायली पावस्कर यांच्या हस्ते बेरड यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी कामगार नेते अभिजीत राणे, मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सचिव सुरज भोईर आदी उपस्थित होते.
मीरा बेरड या दरेवाडी येथील अमृत फूड्सच्या संचालिका आहेत. गेल्या पाच वर्षापासून त्यांनी गृहोद्योग उभा करुन अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांचे आवळ्याचे विविध उत्पादनांना महाराष्ट्रासह इतर राज्यात मागणी आहे. त्या आपल्या उद्योगाबरोबरच इतर गृहोद्योग चालविणार्या महिलांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी तयार केलेला आवळा गुलाबजाम राज्यभर प्रसिध्द आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या विविध उपक्रम घेत असून, महिलांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
तर विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापूर्वी देखील त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून, सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.