वर्गवारी आरक्षणासह विविध मागण्यांसाठी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार पायी मोर्चा
वर्गवारी आरक्षणासाठी युवकाने केलेली आत्महत्या, ही शासनाने घेतलेला बळी -सुनिल शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती साजरी करण्यात आली. शहरातील सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर मातंग समाजाला अ,ब,क,ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करण्याची मागणी करण्यात आली. तर या मागणीसाठी स्वत:चे जीवन संपविणारे नायगाव (जि. बुलढाणा) येथील युवक स्व. अंकुश समाधान खंदारे यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. तर मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या पदयात्रेत मोठ्या संख्येने जिल्ह्यातील समाजबांधव सहभागी होणार असल्याची घोषणा करण्यात आली.
लहुजी शक्तीचे राज्य सचिव तथा जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाठ, विजय पठारे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष ऋषीकेश उमाप, पाथर्डी तालुका उपाध्यक्ष सिताराम शिरसाठ, मनोज शिंदे, सोनू साठे, राहुल झेंडे, गंगाधर डाडर, गणेश पठारे, आदिनाथ शिरसाठ, संदिप हाडके, बाबू शिरसाठ, लखन शिरसाठ, सुभाष शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनुसूचित जातीसंवर्गाचे आरक्षणाचे अ,ब,क,ड प्रमाणे वर्गीकरणाच्या ज्वलंत प्रश्नावर नायगाव (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथील युवक स्व. अंकुश समाधान खंदारे (वय 23 वर्षे) या पदवीधर युवकाने आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून, इथल्या असंवेदनशील व्यवस्थेने घेतलेला बळी असल्याचा आरोप करुन, हा समाजातील ज्वलंत प्रश्न सोडवून मयत युवकाच्या कुटुंबाला न्याय देण्याचे लहूजी शक्ती सेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदेशाध्यक्ष कैलासभाऊ खंदारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला.
जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले की, देशभक्ती व शत्रूंपासून देशाचे संरक्षण हे लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांनी अनेक क्रांतीकारक घडविले. लहुजींचा इतिहास अंधारात ठेवण्यात आला असून, त्याला खऱ्या अर्थाने जगापुढे मांडण्याची गरज आहे. तर अनुसूचित जातीसंवर्गाचा विकास साधण्यासाठी आरक्षणाचे अ,ब,क,ड प्रमाणे वर्गीकरण होणे अपेक्षित आहे. या प्रश्नावर समाजातील युवकाने जीवन संपविले असून, ही आत्महत्या नसून शासनाने घेतलेला बळी असल्याचे त्यांनी सांगितले.
अनुसूचित जाती आरक्षणाचे अ,ब,क,ड प्रमाणे वर्गीकरण करून मातंग समाजातील अपेक्षित वंचितांना न्याय मिळावा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन (आरर्टी) संस्था स्थापन करण्यात यावी, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोगाचे संपूर्ण शिफारशी त्वरित लागू कराव्या, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करुन मुंबई विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात यावे, अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासाठी स्वतःची जीवन यात्रा संपवणारे स्व. अंकुश खंदारे यांच्या परिवारास तात्काळ 10 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावे, त्यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अन्याय, अत्याचाराविरुद्ध व सामाजिक प्रश्नावर आवाज उठविणारे लहुसैनिक व समाज बांधवांविरुद्ध दरोडेसारखे खोटे गुन्हे मागे घ्यावे, विविध मायक्रो फायनान्स कंपनीद्वारे अव्वाच्या सव्वा दराने व्याजदर लावून गोरगरिबांची सुरु असलेली आर्थिक लूट थाबविण्याची उपाययोजना करण्याच्या मागण्यांसाठी पुणे-नागपूर हिवाळी अधिवेशनावर पायी मोर्चा धडकणार असल्याचे स्पष्ट करुन यामध्ये समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.