मुलाखतीद्वारे प्रशिक्षणार्थींची होणार निवड, कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती-जमातीतील युवक-युवतींमधून उद्योजक घडविण्याच्या उद्देशाने उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) व जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर आयोजित आणि महाराष्ट्र उद्योजक व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष मुंबई यांच्या सहकार्याने अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गासाठी 18 दिवसीय निशुल्क निवासी उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती-जमाती विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत 24 नोव्हेंबरला ही कार्यशाळा होणार असून, यामध्ये युवकांची 22 नोव्हेंबर रोजी मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असल्याची माहिती विभागीय अधिकारी (नाशिक) अलोक मिश्रा व प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे यांनी दिली आहे.
प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थीचा चहा, नाष्टा, भोजन व निवासाची व्यवस्था मोफत करण्यात आलेली आहे. प्रवेश मर्यादा 40 व्यक्तींची असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत उद्योग उभारणीतील टप्पे, उद्योग व्यवसाय संदर्भातील शासकीय कामकाज, उद्योग उभारणीसाठी कोणत्या कार्यालयाला भेटावे, उद्योजकतेसाठी आवश्यक असलेले गुण, व्यक्तिमत्व विकास, शासकीय-निमशासकीय कार्यालयातील उद्योग उभारणीसाठी असलेल्या शासकीय योजना, सोयी-सुविधाबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रशिक्षणार्थींना उद्योग निवडीसाठी बाजारपेठ पाहणी, सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, आयात-निर्यात, उद्योग उभारण्यात येणाऱ्या अडचणी व निराकरण या विषयावर तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहे. तसेच ई टेंडर, जेम पोर्टल, डिजिटल मार्केटिंग व कारखाना भेटचे उपक्रम होणार आहेत.
प्रशिक्षणासाठी https://mced.co.in/Training_Details/?id=4542 या संकेतस्थळावर 20 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्याचे सांगण्यात आले आहे.
नाव नोंदणी झालेल्या प्रशिक्षणार्थींची 22 नोव्हेंबर रोजी जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयात मुलाखत होणार आहे. यामधील लाभार्थींची कार्यशाळेसाठी निवड केली जाणार आहे. कार्यशाळेतील उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान सातवी ते दहावी पास व वयोमर्यादा 18 व कमाल 50 वर्षे असणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी 9561737747/ 9975844418 या नंबरवर अथवा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर महाविद्यालय जवळ, स्टेशन रोड येथे संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
