सर्व तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी 21 ऑगस्टला बोलावली बैठक
ती कर्मचारी भरती संपुष्टात आणण्याचे दिले आदेश
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर सैनिक बँकेत गेली सात वर्षात संचालक मंडळाने व कर्मचाऱ्यानी केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई होण्याच्या मागणीसाठी अन्याय निर्मूलन सेवा समिती व सैनिक बँक बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आलेले उपोषण जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (पारनेर) यांच्याकडून कारवाईचे लेखी आश्वासन मिळाल्याने स्थगित करण्यात आले.
पारनेर सैनिक बँकेत गेली सात वर्षात संचालक मंडळाने व कर्मचाऱ्यानी मोठ्या प्रमानात गैरव्यवहार, अपहार, भ्रष्टाचार केला आहे. अनेक प्रकरणात ते दोषी आढळले. परंतु संचालक मंडळावर व कर्मचाऱ्यांवर सहकार खात्याने अद्याप कुठलीही करवाई केलेली नाही. त्यामुळे त्वरित कारवाई करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पप्पू कासोटे, बाळासाहेब धरम, वैभव पाचारणे यांनी उपोषण केले होते.
नोकर भरतीत संचालकांच्या नातेवाईकांना कमी करणे, कर्जत शाखेत बोगस चेक वटवून 1 कोटी 79 लाख रुपयाचां अपहार करत शासकीय रक्कम हडप केल्याने जबाबदारी निश्चित करणे,(विना तारण कर्ज वाटप प्रकरणी जबाबदारी निश्चित करणे), क्रियाशील सभासद असताना अक्रियाशील नोटीसा पाठवून बँकेचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
या उपोषणाची दखल घेऊन सदरच्या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रारदार व बँकेचे संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठकीचे लेखी आदेश काढले आहे. तर सात क्लार्क व एक शिपाई असे एकूण आठ कर्मचारी यांची तात्पुरती कर्मचारी म्हणून बँकेत 235 दिवसांसाठी नेमणूक केलेली आहे. या आठ कर्मचाऱ्यांना तात्पुरते स्वरूपात केलेली नियुक्ती 31 ऑगस्ट अखेर संपुष्टात आणावी. सदर कर्मचारी भरती संपुष्टात आणली नाही, तर वाद उद्भवल्या सर्वस्वी जबाबदार बँकेचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार असल्याचे पत्र सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (पारनेर) गणेश औटी यांनी काढल्याने सदरची कर्मचारी भरती संपुष्टात येणार आहे. हे लेखी पत्र मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
या उपोषणाला सैनिक बँक बचाव कृती समितीचे बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी, संपत शिरसाठ मेजर, मारुती पोटघन, कॅप्टन विठ्ठल वराळ, बँकेचे संचालक, सुदाम कोथिंबीरे, बबनराव सालके, बबन दिघे, संतोष यादव, सुभाष पाटील ठुबे, शंकर नगरे, कुसूम पाचरणे, पुरुषोत्तम शहाणे, माजी सैनिक नंदू राऊत, अशोक गंधाक्ते आदीनीं पाठिंबा दिला होता.