• Thu. Mar 13th, 2025

सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची शहरात निदर्शने

ByMirror

May 31, 2023

इंडिक टेल्स वेबसाईट विरोधात कारवाईची मागणी

महापुरुषांची बदनामी करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यासाठी कायदा निर्माण करण्याची गरज -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले यांचे योगदान व कार्य कुठल्या वेबसाईटवर सांगण्याइतके छोटे नाही. समाजात काही प्रवृत्ती पुढे येत असून, महाराष्ट्राच्या मातीतून घडलेल्या आणि देशाला व जगाला दिशा देणार्‍या महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सातत्याने करण्याचे काम करत आहे. तो राजकीय पक्ष व त्यांचे नेते अशा प्रवृत्तींना पाठिशी घालण्याचे काम करत आहे. महापुरुषांची बदनामी करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याच्या दृष्टीने राज्यात व केंद्रात कायदा निर्माण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. तर भाजप पक्षाचे नाव न घेता त्यांच्यावर निशाना साधला.


इंडिक टेल्स नामक वेबसाईटवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी आक्षेपार्ह लिखाण करुन ते प्रसारित केल्याच्या निषेधार्थ शहरातील माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करुन इंडिक टेल्सवर कारवाई करुन संबंधितांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आमदार जगताप बोलत होते. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, अंबादास गारुडकर, भिंगारचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, अर्बन सेलचे प्रा. अरविंद शिंदे, उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे, महिला राष्ट्रवादीच्या रेश्मा आठरे, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर, दादा दरेकर, विष्णुपंत म्हस्के, बजरंग भुतारे, अशोक गोरे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, गणेश बोरुडे, लहू कराळे, मयुर भापकर, बाबासाहेब गारुडकर, दिपक होले, आनंद पुंड, साधना बोरुडे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, अर्जुन लोंढे, मळू गाडळकर, उमेश धोंडे, मारुती पवार, अभिजीत सपकाळ, ऋषी ताठे, दिपक खेडकर, प्रशांत ढलपे, नितीन लिगडे, सागर गुंजाळ, अक्षय बोरुडे, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर, संतोष हजारे, रामदास फुले, संतोष ढाकणे आदी सहभागी झाले होते.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, सत्ताधारी आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्याचे काम करत आहे. अशाच प्रकारे हे घाणेरडे काम करण्यात आले आहे. तो पक्ष महापुरुषांची बदनामी करणार्‍यांवर कोणतीही भूमिका घेत नाही व कारवाईही करत नाही. हे कृत्य आपल्या पक्षांतील कुणाकडून झाले असते, तर त्या पक्षाने कायद्यात न बसणारे कलमे लावून त्यांना जेलमध्ये घालण्याचे काम केले असते. त्या पक्षात प्रवेश केला तर जणू काही त्यांना असे काम करण्यास लायसन्स मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.


महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍यांचे पुतळे जाळून, त्यांची धिंड काढून त्यांना महाराष्ट्रात फिरु न देण्याचे काम आपल्या सर्व समविचारी पक्षांनी व नागरिकांनी केले पाहिजे. त्यानंतरच त्यांचे तोंड बंद होतील. त्या पक्षातील व्यक्तींशी निगडीतच ही वेबसाईट असल्याचा दावा आमदार जगताप यांनी केला. तर तत्कालीन राज्यपालांनी महापुरुषांबद्दल अनेक वादग्रास्त विधान केली. त्यांच्यावर त्या पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कारवाई होत नाही, यावरुन सरकारला महापुरुषांबद्दल किती गांभीर्य आहे? हे लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, इंडिक टेल्स नामक वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत आक्षेपार्ह केलेले लिखाण वेदनादायी व निंदनीय आहे. छत्रपती फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार संतापजनक आहे. महापुरुषांच्या इतिहासाची मोडतोड करून चुकीच्या पध्दतीने मांडणार्‍या प्रवृत्तीला वेळीच ठेचण्याची गरज असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *