सामाजिक कार्याचा विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन, मराठा समन्वय परिषद व हिरकणी ग्रुपच्या वतीने गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या लतिका पवार यांना राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन, मराठा समन्वय परिषद व हिरकणी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे यांच्या हस्ते पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माऊली सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नोबेल मेडिकल फाउंडेशनच्या विश्वस्त डॉ. संगीता कांडेकर, अलकाताई मुंदडा, उद्योजिका संगीताताई गुरव, करुणा मोरे, रेश्मा आठरे, मनिषा मोरे, प्रतिभा ठाकरे आदी उपस्थित होत्या.
लतिका पवार हे मागील अनेक वर्षापासून निस्वार्थ भावनेने सामाजिक योगदान देत आहे. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. महिला सक्षमीकरणासह गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना मदतीचा आधार देत आहेत. लायनेसच्या अध्यक्षा असताना त्यांनी पंचशील विद्यामंदिर शाळेतील 360 विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी केली. विविध कलागुण अंगी असलेल्या मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेतल्या. श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतील 70 विद्यार्थ्यांचे एक वर्षासाठी शैक्षणिक पालकत्व त्यांनी स्वीकारले होते. वंचित घटकांसाठी त्यांनी नेहमीच सढळ हाताने मदत केली आहे. कुष्ठधाम मधील कुष्ठरोगीसाठी विविध उपक्रम राबविले, अनामप्रेम संस्थेतील अंध विद्यार्थी व उत्कर्ष बालघर प्रकल्पातील निराधार विद्यार्थ्यांना त्यांनी मदतीचा हात दिला. समाजातील उपेक्षित घटकांना प्रवाहात आणण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे.
या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यापूर्वी देखील त्यांना सामाजिक कार्याबद्दल विविध जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.