चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद
महापुरुषांचे वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- समृद्धी महिला बहुउद्देशीय सोसायटीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव शालेय विद्यार्थ्यांमध्ये फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा जागर करण्यात आला.
आलमगीर (ता. नगर) येथील किड्स जी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांचे वेशभूषा परिधान करून त्यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले. धुर्विका गारदे हिने सावित्रीबाई फुले, विहान भोजीया याने महात्मा फुले व अंशिका शिरसाठ हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूष केली होती.
शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबवून, नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. तर सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यानातून महापुरुषांचे कार्य विद्यार्थ्यांपुढे मांडण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या संचालिका सविता राम पानमळकर, संस्थेच्या अध्यक्षा स्वाती डोमकावळे, मुख्याध्यापिका आरती गारदे, शिक्षिका कल्पना देशेट्टी आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सविता पानमळकर म्हणाल्या की, आदर्श समाज निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार देण्याची गरज आहे. या विचाराने सशक्त भारत घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वाती डोमकावळे यांनी भावी पिढीत महापुरुषांचे विचार रुजविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे. तर आरोग्यासाठी स्वच्छतेचा संदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे समन्वयक शिवाजीराव खरात, जय युवा अकॅडमीचे अॅड. महेश शिंदे, पोपट बनकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे यांचे मार्गदर्शन लाभले.