पारनेर तालुका सैनिक बँकेची प्रारूप यादी प्रसिद्ध
गैरव्यवहार झाकण्यासाठी व मर्जीतले संचालक मंडळ येण्यासाठी सभासदांना निवडणुकीच्या प्रक्रियेपासून लांब ठेवल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी 4 हजार 198 सभासदांची प्रारूप यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी 29 मे रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात 7 जून 2023 पर्यंत हरकती स्विकारणे,19 जूनला हरकतीवर निर्णय देणे व 26 जूनला अंतिम यादी प्रसिद्ध करणे असा मतदार यादीचा कार्यक्रम लावला आहे.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे जवळजवळ 12 हजार सभासद होते. मात्र बँकेने पोटनियमात दुरुस्ती केल्याने त्यातील जवळजवळ 8 हजार संस्थापक सभासद कमी झाले आहेत. ज्या सभासदाचे शेअर्स 1 हजार पेक्षा कमी आहेत व ज्या सभासदाची 5 हजार रुपयांची मुदत ठेव पावती नाही. असे सभासद अपात्र झाले आहेत. तरी सभासदांनी उर्वरित शेअर्स भाग रक्कम व 5 हजार ठेव पावती रक्कम बँकेत भरून मतदानास पात्र व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे व काही भ्रष्टाचारात गुंतलेले कर्मचार्यांनी केलेला गैरव्यवहार झाकावा म्हणून बँकेत स्वत:च्या मर्जीतील संचालक मंडळ यावे म्हणून संस्थापक तथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह 8 हजार सभासदांना निवडणुकीच्या प्रक्रियेपासून लांब ठेवले असल्याचा आरोप बाळासाहेब नरसाळे व विनायक गोस्वामी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
8 हजार सभासदांच्या हक्कासाठी उच्च न्यायालयात -नरसाळे
संचालक मंडळाने उपविधी दुरुस्ती मसुदा सभासदांच्या माहितीसाठी दिलेला नाही, कोविड काळात ऑनलाईन पद्धतीने मसुदा मंजुरी मिळवली. कलम 23 प्रमाणे सभासदत्व खुले आहे. मंडळाने केलेल्या उपविधी दुरुस्तीने जुन्या सभासदांच्या हक्कावर गदा आली आहे. संचालकांचा उपविधी दुरुस्तीचा उद्देश व्यापक व सभासद हिताचा नाही. कोविडमुळे क्रियाशील सभासद अट मंत्रिमंडळाने रद्द केली असून, तसेच 1960 मधील कलम 26 चे पोट कलम 2 व 27 मधील पोट कलम (1 अ) मध्ये सुधारणा झाल्यामुळे निवडणुकीत विद्यमान सदस्य हे मतदान करण्यासाठी पात्र ठरतील. 8 हजार सभासदांचा प्रतिनिधी म्हणून उच्च न्यायालयात गेल्याचे बाळासाहेब नरसाळे यांनी म्हंटले आहे.
बँकेचे संस्थापक तथा ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनाही उपविधी दुरुस्तीच्या नावाखाली अपात्र ठरविण्यात आले आहे. सुरवातीला त्यांच्यासह 8 हजार सभासदांनी 100 रुपये शेअर्स घेत बँकेचे भाग भांडवल उभे केले. बँकेत विद्यमान संचालक मंडळाने भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहार केला त्यामुळे त्यांच्या चौकश्या सुरु आहे. आपण पुन्हा सत्तेत येणार नसल्याचे लक्षात आल्यावर संचालकांनी एकाच दिवसात तब्बल 1400 सभासद वाढविले व जुने सभासद मतदानास अपात्र ठरावेत म्हणून उपविधी दुरुस्त केला. त्यामुळे अपात्र ठरलेल्या सभासदांना मतदानाचा मूलभूत हक्क बजावता येणार नाही. सामान्य सभासदाला निवडणुकीच्या प्रक्रियेपासून लांब ठेवणार्या झुंडशाहीविरोधात लढा उभारणार असल्याचे विनायक गोस्वामी यांनी म्हंटले आहे.