• Fri. Mar 14th, 2025

शहरात इंडिक टेल्सच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण

ByMirror

Jun 1, 2023

युवकांच्या गंभीर प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करुन युवकांना जाती, धर्मात गुंतविण्याचा प्रकार -इंजि. केतन क्षीरसागर

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार्‍यांवर कारवाई न करता त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम भाजप सरकार करत आहे. वारंवार महापुरुषांबद्दल होणारे आक्षेपार्ह वक्तव्य थांबविण्यासाठी कठोर शिक्षेचा कायदा निर्माण करण्याची गरज आहे. देशातील युवक-युवतींच्या शिक्षण व रोजगाराचा गंभीर प्रश्‍न भेडसावत असताना, या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करुन युवकांना जाती, धर्मात गुंतविण्यासाठी असे वादग्रस्त विधान केले जात असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी केले.


इंडिक टेल्स नामक वेबसाईटवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी आक्षेपार्ह लिखाण करुन ते प्रसारित केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक व युवती काँग्रेसच्या वतीने शहरातील माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर इंडिक टेल्सच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले. तर सदर वेबसाईटवर बंदी टाकून लिखाण करणार्‍या व प्रकाशित करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी इंजि. क्षीरसागर बोलत होते.


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचा जयजयकार करत आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रारंभी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी युवतीच्या शहर जिल्हाध्यक्षा अंजली आव्हाड, आशुतोष पाणमाळकर, केतन धवन, मयूर तींडवाणी, श्रावण जाधव, समृद्ध दळवी, किरण घुले, अमोल बाली, दीपक गोरे, दिग्विजय जाधव, मंगेश शिंदे, युवती कार्यध्यक्षा सुजिता दिवटे, योगिता कुडिया, सुनीता गुगळे, ओंकार म्हसे, शिवम कराळे, अभिजीत खरात, संदीप गवळी, गौरव हरबा, साहिल पवार, राशू गाडेकर, पंकज शेंडगे, किशोर थोरात, केदार रंजक, महेश गुप्ता, रमेश भिंगारदिवे, मंगेश जोशी, कुणाल ससाणे, अल्ताफ शेख, अब्दुल इनामदार, स्वप्निल कांबळे, शुभम जोशी, मयूर भोसले आदींसह युवक-युवती सहभागी झाले होते.


पुढे इंजि. क्षीरसागर म्हणाले की, इंडिक टेल्स नामक वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत आक्षेपार्ह केलेले लिखाण निंदनीय आहे. यापूर्वी देखील राज्यपाल व भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन देखील त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याने याची पुनरावृत्ती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.


अंजली आव्हाड म्हणाल्या की, महिलांना शिक्षण देऊन ज्यांनी समाज घडविला, अशा क्रांतीज्योतीवर आक्षेपार्ह लिखाण केलेल्यांवर कारवाई होण्याची गरज आहे. मात्र भाजप सरकारने कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही. महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्‍यांवर कारवाई न झाल्यास ही प्रवृत्ती वाढत आहे. केंद्र व राज्य सरकार ठोस पाऊले उचलून महापुरुषांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *