निरोगी आयुष्य व तणावमुक्तीचे निशुल्क धडे दिल्याचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांना निरोगी आयुष्य व तणावमुक्त जीवनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून योग-प्राणायामाचे धडे देणारे रामचंद्र बाबूराव लोखंडे यांना छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी लोखंडे यांना पुरस्कार प्रदान केला. यावेळी नगर तालुका तालिम सेवा संघाचे सचिव पै. बाळू भापकर उपस्थित होते.
रामचंद्र लोखंडे ग्रामीण भागात योग, सुदर्शन क्रिया व ध्यानचे निशुल्क शिबिर घेत असतात. तसेच व्यसनमुक्तीवर व्याख्यान देऊन युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य ते करत आहे. समाज निरोगी करण्याच्या उद्देशाने त्यांचे कार्य सुरु आहे. युवकांना तणावमुक्ती व उत्साहासाठी नकारात्मक भावनेतून मुक्ततेसाठी त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरत आहे. त्यांचे निरोगी आरोग्यासाठी सुरु असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देण्यात आल्याचे पै. नाना डोंगरे यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना रामचंद्र लोखंडे म्हणाले की, निरोगी भारत घडविण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. सक्षम समाज निर्मितीसाठी व शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी हे शिबिर राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.