• Sat. Mar 15th, 2025

रक्तदान करुन छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

ByMirror

May 15, 2023

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचा उपक्रम

रुग्णांच्या आयुष्यासाठी रक्त ही जीवनावश्यक बाब -संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युवकांनी रक्तदान करुन छत्रपती संभाजी महाराजांना आगळ्या वेगळ्या पध्दतीने मानवंदना दिली. रक्तदान राजांसाठी हे ब्रिद वाक्य घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस व श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने माळीवाडा वेस येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.


आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, महापालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे, समृध्द दळवी, डॉ. अजिंक्य आठरे, संजय सपकाळ, गणेश बोरुडे, किशोर मरकड, राजेश परकाळे, रक्तदान शिबिराचे संयोजक तथा राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर सतीश इंगळे, गणेश फसले, राष्ट्रवादीचे सरचिटणीस गणेश बोरुडे, मयुर रोहोकले, अभिजीत खरात, साहिल पवार, डॉ. किरण चव्हाण आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, धकाधकीच्या जीवनात रक्ताची केंव्हा व कोणाला गरज भासेल सांगता येत नाही. रुग्णांच्या आयुष्यासाठी रक्त ही जीवनावश्यक बाब बनली आहे. मनुष्याला रक्तासाठी मनुष्यावरच अवलंबून रहावे लागते. महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी रक्तदान व आरोग्य शिबिराने साजरी झाल्यास अनेक गरजूंना जीवदान मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.


इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपले रक्त सांडले. या युगपुरुष राजांसाठी रक्तदानाने अभिवादन करण्याचे ठरविण्यात आले होते. रक्तदानाने समाजातील अनेक गरजूंना जीवदान मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजकारण करताना समाजकारण केंद्र बिंदू ठेऊन कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदात्यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. रक्तदान शिबिराला न्यू अर्पण व्हॉलंटरी ब्लड सेंटरचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *