भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाल्यास क्रांतिकारक बदल घडणार -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कापूरवाडी (ता. नगर) येथील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या मिरावली पहाडवरील दर्गाच्या आवारात नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, मिरावली पहाड ट्रस्टचे विश्वस्त बाबासाहेब जहागीरदार, फैजान जहागीरदार, इरफान जहागीरदार, दिलावर सय्यद, बापू कदम, नामदेव माऊली, गोरख काळे, बाबासाहेब काळे आदी उपस्थित होते.
नेहरु युवा केंद्राच्या मिशन लाईफ उपक्रमांतर्गत श्री नवनाथ युवा मंडळाच्या माध्यमातून जलसंधारण, पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षरोपण व संवर्धनावर कार्यक्रम घेण्यात येत आहे. यानिमित्ताने मिरावली पहाडवर वृक्षरोपण करण्यात आले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, पर्यावरणाप्रती आस्था प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. यासाठी भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाल्यास क्रांतिकारक बदल घडणार आहे. मिरावली पहाड येथे विविध ठिकाणचे सर्व धर्मिय भाविक येतात. हा परिसर हिरवाईने फुलविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. उजाड माळरान व डोंगर रांगा हिरवाईने फुलल्यास पर्यावरणाचे संवर्धन होणार असल्याचे सांगितले. तर पावसाळ्यात संस्थेच्या वतीने पहाड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.