प्रवचनातून समाज जागृती व विविध सामाजिक कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रवचनातून समाज जागृती करुन व विविध सामाजिक उपक्रम राबविणारे ह.भ.प. अॅड. सुनिल महाराज तोडकर यांना अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
महात्मा फुले जयंतीनिमित्त शहरात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते अॅड. तोडकर यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अंबादास गारुडकर, धनंजय जाधव, दत्ता जाधव, परेश लोखंडे, गणेश नन्नवरे, मंगळ भुजबळ, हर्षल बोराटे, गणेश बनकर, नितीन डागवाले, अनिल लोंढे आदी समाजातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह.भ.प. अॅड. सुनिल महाराज तोडकर वकिली व्यवसाय करुन मागील वीस वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे. त्यांनी संत शिरोमणी सावता महाराजांवर चरित्र ग्रंथ लिहिला असून, प्रवचनाच्या माध्यमातून ते समाज जागृतीचे कार्य सातत्याने करत आहे. नर्मदा फाऊंडेशनच्या माध्यमातून अॅड. तोडकर यांनी पाणी अडवा पाणी जिरवा, मुलगी वाचवा… मुलगी शिकवा, स्वच्छ भारत अभियान, एड्स जनजागृती या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवला आहे. तर वृक्षरोपण, रक्तदान, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सुरु असून, या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येत असल्याचे महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर यांनी सांगितले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर वकील संघाचे अध्यक्ष संजय पाटील, माजी अध्यक्ष भुषण बर्हाटे, सचिन धिमते, अॅड. सुरेश लगड, अॅड. शिवाजी कराळे, अॅड. महेश शिंदे, पोपट बनकर यांनी अॅड. तोडकर यांनी शुभेच्छा दिल्या. तर विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.