प्रलंबीत मागण्यांसाठी वेधले सरकारचे लक्ष
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मागणी दिनानिमित्त मंगळवारी (दि.4 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन, जुनी पेन्शनसह केंद्र व राज्य पातळीवरील प्रलंबीत मागण्या पूर्ण करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर सरकारी कर्मचारी यांनी मागणी दिनानिमित्त विविध सरकारी कार्यालया समोर भोजनाच्या सुट्टीत निदर्शने केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या निदर्शनाप्रसंगी मध्यवर्ती संघटना अहमदनगर जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, भाऊ शिंदे, विलास पेद्राम, भाऊसाहेब डमाळे, पी.डी. कोळपकर, वंदना नेटके, विजय काकडे, महेश म्हस्के, संदेश दिवटे, अक्षय फलके, राजेंद्र लाड, गणेश कोळकर, धनसिंग गव्हाणे, संजय जायभाय, जगदीश वाघ, गिरीश गायकवाड आदी उपस्थित होते.
नुकताच झालेल्या बेमुदत संपाचा परिणाम महाराष्ट्रात अद्याप टिकून आहे. कर्मचारी शिक्षकांच्या या अतूट एकजुटीच्या विराट दर्शनामुळे कर्मचारी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निश्चित मार्गे लागतील अशी अपेक्षा राज्यभर कर्मचार्यांमध्ये निर्माण झाली आहे.जिव्हाळ्याचे प्रलंबित मागण्याबाबत शासनावर दबाव कायम राखणे व वाढविणे हे संघटनात्मक पाऊल टाकले जात असल्याचे यावेळी संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
राज्यस्तरावर जुनी पेन्शनसह इतर 17 मागण्या, पी.एफ.आर.डी.ए. कायदा रद्द करा, आठव्या वेतन आयोगाचे गठन करा, कंत्राटी व अंशकालीन कर्मचार्यांच्या सेवा नियमित करा, अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी घातलेल्या अटी-शर्ती रद्द करा, खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करा, कामगार कर्मचार्यांच्या हक्कांचा संकोच करू नका, नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.