फिरोज शफी खान व बाबासाहेब बलभीम सानप यांच्यावर गुन्हा दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक असलेल्या महिला पदाधिकारीला कारवाई केल्याचा राग मनात धरुन धमकाविणे शहरातील दोन ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना चांगलेच महागात पडले आहे. महिला अधिकारीच्या फिर्यादीवरुन फिरोज शफी खान व बाबासाहेब बलभीम सानप यांच्यावर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये धकाविणे व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला रविवारी (दि.14 मे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयेशा शेख या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटर वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये जनसेवा ट्रान्सपोर्टची वाहने भार क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक करित असल्याने सदर वाहनांवर कारवाई केली होती. तेव्हा जनसेवा ट्रान्सपोर्टचे संचालक फिरोज शफी खान व बाबासाहेब बलभीम सानप यांच्यात बोलाचाली झाली. त्यानंतर त्यांनी पाहून घेऊ असा दम दिला होता. त्यानंतर 8 मे रोजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त महालेखाकार कार्यालय कामकाज देण्यात आलेले होते. 8 मे रोजी जनसेवा ट्रान्सपोर्टचे वाहणावर ओव्हर लोड बाबत रितसर कार्यवाही केली. सदर कारवाई केल्याचा राग मनात धरुन फिरोज खान व बाबासाहेब सानप गेल्या काही वर्षापासून कार्यालयात येऊन नोकरी घालविण्याची वारंवार धमक्या देत असल्याचा आरोप फिर्यादीने केलेला आहे.
8 मे रोजी खान व सानप यांच्यासह दोन ते तीन अज्ञात इसमांनी माझ्या कार्यालयातील केबीनमध्ये प्रवेश करुन कारवाई करायची नाही, अन्यथा तुमची नोकरी घालवू! अशा धमक्या दिल्या. शाब्दीक बाचाबाची करुन भावनिक छळ केला व करीत असलेल्या शासकिय कामकाजात अडथळा निर्माण केला. तुमच्या विरुध्द वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारी मागे घ्यावयाच्या असतील तर तुम्हाला आमच्या सोबत तडजोड करुन पैसे दयावे लागतील तुम्ही आम्हास पैसे दिले नाही तर आंम्ही तुमच्या विरुध्द दिलेल्या तक्रारी मागे घेणार नाही, असे म्हणून तेथून सर्वजन निघून गेले. तर खाजगी वाहनावरील तात्पुरते चालक श्रीकांत गुंजाळ याचा छुपा पाठलाग केल्याचे फिर्यादीत शेख यांनी म्हंटले आहे.
