• Thu. Mar 13th, 2025

महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे रविवारी श्रीरामपूरला जिल्हाव्यापी मेळावा

ByMirror

May 4, 2023

पेन्शन वाढीचे ऑनलाईन फॉर्म व दिल्ली येथील स्थायी समितीच्या बैठकीची दिली जाणार माहिती

पेन्शनवाढ व महागाई भत्त्याच्या मागणीसाठी संघटनेच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासह भारत सरकारच्या नवी दिल्ली येथे झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीची माहिती देण्यासाठी व संघटनेची पुढील दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या वतीने रविवारी (दि.07 मे) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व ईपीएस 95 पेन्शनर्सना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष एस.एल. दहिफळे व सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी केले आहे.


नेवासा-रोड श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटल येथे 12:30 वाजता मेळाव्याला प्रारंभ होणार आहे. ऑल इंडिया कॉर्डिनेशन समिती ऑफ ईपीएफ पेन्शन असोसिएशनचे निमंत्रक कॉ. अतुल दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होणार आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बर्‍याचशा पेन्शन धारकांनी पेन्शन वाढीचे फॉर्म भरून दिले आहेत. काहींनी ऑनलाइन भरले आहेत, तर काहींचे ऑनलाइन झालेले नाही. त्यानुसार काही पेन्शन धारकांना सहाय्यक आयुक्त भविष्य निर्वाह निधी कार्यालय नाशिक यांच्याकडून लेखी पत्रही आले आहेत. त्यावरील सविस्तर चर्चा करून पुढील माहिती देण्यात येणार आहे. तसेच भारत सरकारच्या स्थायी समितीने नवी दिल्ली येथे 20 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या बैठकीला प्रकाश येंडे हजर होते. त्या बैठकीची माहिती देण्यासाठी येंडे पेन्शनर्सशी संवाद साधणार आहेत.


पेन्शनधारकांना किमान 9 हजार व महागाई भत्ता मिळावा यासाठी पुढील आंदोलनाची दिशा या मेळाव्यात ठरविण्यात येणार आहे. गेली दहा ते बारा वर्षे प्रयत्न करूनही अद्याप पेन्शन वाढ झाली नाही, त्यामुळे येत्या 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीबाबत पेन्शन धारकांनी काय भूमिका घ्यावी? यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष बाबुराव दळवी, ज्ञानदेव आहेर, बाबासाहेब गाढे, अंकुश पवार, खजिनदार अशोक पवार, चिटणीस भागिनाथ काळे, बाळासाहेब चव्हाण, आबासाहेब सोनवणे, अशोक पाटील आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *