उपोषणाचा फार्स करुन अद्यापि पुतळ्यासाठी परवानगीचे भिजते घोंगडे ठेवणार्यांनी जाब द्यावा
एवढी वर्षे अनास्था दाखवणार्यांना निवडणुकीच्या तोंडावर जाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रोफेसर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी सन 2007 मध्ये जागा निश्चित करुन महापालिकेच्या महासभेत निर्णय झाला असताना या कामासाठी 17 वर्ष लावणार्या लोकप्रतिनिधींनी उत्तर द्यावी. उपोषणाचा फार्स करुन अद्यापि पुतळ्यासाठी परवानगीचे भिजते घोंगडे ठेवणार्यांना नगरकरांनी जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे दीप चव्हाण यांनी म्हंटले आहे. तर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा काही वर्षानंतर उभा रहावा ही सर्व नगरकारांची इच्छा होती व आहे. मात्र या पुतळ्यासाठी 17 वर्षात लोकप्रिनिधींनी परवानग्या मिळवल्या नसल्याचा आरोप करुन राजकारणासाठी महापुरुषांच्या पुतळ्यांचा विषय पुढे आनला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

2007 मध्ये संदीप कोतकर महापौर असताना महासभेमध्ये चर्चा करुन प्रोफेसर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी शासनाची अटी व शर्तीसह सर्व सरकारी खात्याचे परवानगी घेणे बंधनकारक होते. परंतु सन 2007 ते 2023 पर्यंत संग्राम जगताप, शिलाताई शिंदे, सुरेखा कदम, पुन्हा संग्राम जगताप, अभिषेक कळमकर, बाबासाहेब वाकळे असे सात महापौर झाले आहे. यामध्ये संग्राम जगताप हे दोन वेळा महापौर व आमदार राहिले आहेत. तसेच सेना-भाजप यांचे दोन वेळा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतानाही पुतळा उभारण्यासाठी संबंधित विभागाच्या परवानग्या व धोरणात्मक मान्यता मिळविण्यासाठी 17 वर्षाचा काळावधी लोटला हे नगरकरांच्या दृष्टीने दुर्देवी आहे.

या कामासाठी फक्त पोलीस अधीक्षक यांची तर महाराष्ट्र राज्याचे मुख्य आर्किटेक यांची काही महिन्यांपूर्वी परवानगी प्राप्त झाली आहे. मात्र महत्त्वाची असलेली नगर विकास मंत्रालयांची अंतिम मंजुरी बाकी आहे. सदरील सर्व परवानगी प्राप्त झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत मंजूर करणे बंधनकारक आहे. ती प्रक्रिया अद्याप पर्यंत झालेली नसल्याचे चव्हाण यांनी म्हंटले आहे.
मागील 17 वर्षांमध्ये या एकाच पुतळ्याच्या बाबतीत अंतिम निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्ण कृती पुतळ्याबाबत देखील घोषणा करण्यात आलेल्या आहेत. जर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास 17 वर्षानंतरचा दिवस उजाडावा लागतो, तर या पुतळ्यांसाठी देखील किती वर्षे लागतील? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी अंतिम मंजुरी प्रलंबीत असताना पुतळ्याच्या चौथारा बांधण्याची निविदा 17 वर्षानंतर मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवलेली आहेत व त्याला स्थायी समितीची मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा आहे. स्थानिक पदाधिकार्यांनी महापालिकेत व शासन स्तरावर सत्ता असताना देखील पुतळा उभारणीसाठी 17 वर्षात कारवाई पूर्ण केलेली नाही. तर जबाबदार लोकप्रतिनिधींनी अनास्था दाखवली, मात्र निवडणुकीच्या तोंडावर जाग येऊन भावनिक राजकारण खेळण्याचे काम सुरु असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे.
शहरात महापुरुषांचे पुतळे तात्काळ उभारावे, मात्र त्यावर कोणीही राजकारणाची पोळी भाजू नये. महापालिकेने वाडियापार्क छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव आठ ते नऊ वर्षापूर्वी मंजुर झालेला आहे. मात्र त्याची प्रक्रिया अद्यापि पूर्ण झालेली नाही. ती प्रक्रिया देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहे. त्याकडे देखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असून, हा प्रश्न देखील मार्गी लावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.