• Thu. Oct 16th, 2025

बालकांना थोर महापुरुषांच्या आत्मचरित्रांची पुस्तके भेट देऊन बालदिन साजरा

ByMirror

Nov 15, 2022

भिंगार राष्ट्रवादीने बालभवनात राबविला आगळा-वेगळा उपक्रम

मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांना वाचनासाठी प्रेरणा

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहर राष्ट्रवादीच्या वतीने बालभवन मध्ये बालदिन साजरा करुन विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या आत्मचरित्रांची पुस्तके भेट देण्यात आली. थोर महापुरुषांचे कार्य भावी पिढीला समजण्यासाठी व त्यांचे विचार रुजविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांच्या हातात पुस्तके देऊन त्यांना वाचनासाठी प्रेरित करण्यात आले.


भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सर्वेश सपकाळ, व्यापार व उद्योग सेलचे अनंत गारदे, ओबीसी सेलचे अमित खामकर, कॅन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, दिपक बडदे, संतोष हजारे, मेजर दिलीप ठोकळ, केशव रासकर, सदाशिव मांढरे, अभिजीत सपकाळ, बालभवनच्या गुलनाज सय्यद, सुप्रिया सदलापूरकर, अंजुम शेख, शिला साळवे, मारुती पवार, शिवम भंडारी, युवकचे जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, विशाल बेलपवार, मतीन ठाकरे, संजय खताडे, देवेंद्र जाधव, विजय नामदे, सागर चवंडके आदी उपस्थित होते.


प्रारंभी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांना उपस्थितांनी गुलाबाची फुले, खाऊ व पुस्तकांचे वाटप केले. विद्यार्थ्यांनी यावेळी दररोज वाचन करण्याचा संकल्प व्यक्त केला.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, इतिहास माहीत असणारी माणसे इतिहास घडवित असतात. यासाठी चांगले वाचन आवश्यक आहे. भावी पिढी मोबाईलमध्ये गुंतली असताना, त्यांचा हातात महापुरुषांच्या आत्मचरित्रांची पुस्तके देण्याचा उपक्रम कौतुकस्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादीत एकनिष्ठपणे काम करण्यास तब्बल तीन दशके पूर्ण झाली आहे. समाजकारण या ध्येय व विचाराने कार्य सुरु आहे. भावी पिढीवर संस्कार रुजविण्यासाठी महापुरुषांच्या आत्मचरित्रांची पुस्तके वाचनासाठी देण्यात आली आहे. वाचनाने मुले घडणार असून, वंचित घटकातील मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्नशील असून, राजकारणाबरोबर समाजकारण करताना वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी नेहमीच पुढाकार राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *