लोकशाही व धर्मांध शक्ती विरोधात बहुजन समाजाला एकवटण्याचे आवाहन
गावातील अठरा पगड बारा बुलतेदारांना एकत्र करुन धर्मांध शक्तीला रोखता येणार -सुनील ओहळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने गाव चलो अभियानातंर्गत चांडगाव (ता. श्रीगोंदा) येथे झालेल्या बैठकित सामाजिक एकतेचा संदेश देऊन, लोकशाही व धर्मांध शक्ती विरोधात बहुजन समाजाला एकवटण्याचे आवाहन करण्यात आले.
बहुजन समाज पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य सुनील ओहळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, मेजर राजू शिंदे, सलीम अत्तार, नितीन जावळे, गणेश बागल, ग्रामपंचायत सदस्य नारायण घोडके, पोलीस पाटील प्रकाश घोडके, जयश्री घोडके, रमेश घोडके, जयदीप इथापे, जनार्दन म्हस्के,बलभीम घोडके, लब्बू मोरे, संजय घोडके, दत्तू माळी, राजू माळी, वसंत माळी, गुलाब मोरे, सचिन घोडके, भास्कर देवकर, सुनील चव्हाण आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनील ओहळ म्हणाले की, जातीयवाद व धर्मांधशक्तीचे उच्चाटन करण्यासाठी गावो-गावी जावून शाहू, फुले, आंबेडकरी विचार देण्याची गरज निर्माण झाली आहे. गाव हा देशाचा आत्मा असून, गावातील अठरा पगड बारा बुलतेदारांना एकत्र करुन धर्मांध शक्तीला रोखता येणार आहे. अन्यथा ही धर्मांध शक्ती संविधानाचा घात केल्या शिवाय राहणार नाही, यासाठी या अभियानाद्वारे जागृती करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
उमाशंकर यादव म्हणाले की, भाजप सरकार प्रादेशिक राजकीय पक्ष व संविधान संपविण्याचा घाट घातला आहे. याला उत्तर देण्यासाठी बहुजन समाजाला जोडण्याचे काम या अभियानाद्वारे करण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मेजर राजू शिंदे म्हणाले की, 16 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या मुंबई जवळील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने वीस पेक्षा जास्त नागरिकांचा जीव गेला. याला राज्य व केंद्र सरकार जबाबदार आहे. सर्वसामान्यांच्या जीवाची सत्ताधार्यांना पर्वा नसून, फक्त राजकारण करुन सत्ता ताब्यात ठेवण्याचे काम सत्ताधारी करत आहे. देशाचे व राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे मृत्यू कांड घडलेले असल्याने सर्व घटनेची तटस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली. महाराष्ट्रभर पक्षाच्या नेत्या बहन कुमारी मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रमुख पदाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभियान सुरु आहे.