डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त गाव चलो अभियान! चे प्रारंभ करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून पक्षाची शाहू, फुले, आंबेडकरी विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे.
मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेत बाबासाहेबांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनिल ओव्हळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, मेजर राजू शिंदे, शाळेच्या मुख्याध्यापिका व्हि.डी. पारोदे, नाना पवार, गणेश बागल, संतोष मोरे, तन्मय मोरे, बसपा मांडवगणचे सलीम अत्तार, बाळासाहेब मधे, विशाल पवार, सहाय्यक शिक्षक एच.डी. शेळके आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनिल ओव्हळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीय उतरंडी नष्ट करण्यासाठी आपले जीवन वेचले. मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करुन दिला. उन्नतचेतनेने त्यांनी ही क्रांती घडवली. त्यांचे कार्य आजही दीपस्तंभाप्रमाणे असून, त्यांचे विचार सर्वांच्या कृतीत उतरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. उमाशंकर यादव यांनी घटनेला अभिप्रेत व लोकशाही विचाराने बसपा समाजातील दीन-दुबळ्यांचे नेतृत्व करीत आहे. बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेऊन बहन मायावतीजी पक्षाची धुरा सांभाळत असून, महाराष्ट्राच्या राजकारणातही पक्षाने स्थान निर्माण केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.