पंढरपूरच्या माऊली जमदाडेला चितपट करत पटकावली मानाची कुस्ती; नागपंचमीच्या आखाड्यात मल्लांच्या डावपेचांचा थरार
हिंदुत्व प्रतिष्ठान व नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने रंगले कुस्ती मैदान; विजयी मल्लांवर बक्षिसांचा वर्षाव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सीना नदीकाठी असलेल्या श्री वारुळाचा मारुती मंदिर परिसरात नागपंचमीनिमित्त भरलेल्या यात्रेच्या उत्साहात भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले. शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने हिंदुत्व प्रतिष्ठान व नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने, युवा नेते तथा नगरसेवक पै. महेश लोंढे यांच्या पुढाकारातून झालेल्या या कुस्ती मैदानात राज्यभरातील नामवंत मल्लांनी सहभाग घेत लाल मातीच्या आखाड्यात आपल्या कुस्ती कौशल्याचे दर्शन घडविले. तोडीस तोड मल्ल आमनेसामने आल्याने एकापेक्षा एक रंगतदार कुस्त्या पाहण्याची पर्वणीच कुस्तीप्रेमींना मिळाली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कुस्ती मैदानाला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
मुख्य कुस्तीत सोलापूरच्या माऊली कोकाटेने पंढरपूरच्या माऊली जमदाडेला चितपट करत विजय मिळविला. कोकाटेने केलेल्या दमदार डावाने नालेगावचा आखाडा टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. कुस्तीप्रेमींनी विजयी मल्लाचे उत्स्फूर्त स्वागत करत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सीना नदीकाठी असलेले श्री वारुळाचा मारुती मंदिर हे शहरातील अतिशय पुरातन व जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. दरवर्षी नागपंचमीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठी यात्रा भरते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुस्ती मैदान आयोजित करण्याची नालेगावची जुनी परंपरा आहे. शहरासह विशेषतः नालेगाव परिसराला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली असून, या परंपरेला पुढे नेत नवोदित मल्लांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना मोठ्या आखाड्याचा अनुभव मिळावा आणि कुस्तीची संस्कृती जपली जावी, या उद्देशाने यंदाही भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले.
आखाड्यात लहान-मोठ्या मल्लांच्या अनेक कुस्त्या रंगल्या. प्रत्येक कुस्तीमध्ये मल्लांनी आपल्या ताकदीसोबतच डावपेच, चपळाई आणि तंत्रशुद्ध कुस्तीचे प्रदर्शन केले. त्यामुळे मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये प्रत्येक कुस्तीबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. मैदानातील सर्वाधिक आकर्षण ठरलेली एक नंबरची कुस्ती सोलापूरचा माऊली कोकाटे आणि पंढरपूरचा माऊली जमदाडे यांच्यात झाली. दोन्ही मल्लांनी सुरुवातीपासूनच सावध आणि आक्रमक खेळ करत एकमेकांचा अंदाज घेण्यास सुरुवात केली. काही वेळ डावपेचांचा खेळ रंगला. अखेर सोलापूरच्या माऊली कोकाटेने योग्य संधी साधत दमदार डाव टाकला आणि पंढरपूरच्या माऊली जमदाडेला चितपट केले.
कोकाटेच्या या विजयी डावानंतर आखाड्याभोवती उपस्थित असलेल्या हजारो कुस्तीप्रेमींनी टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला. विजयी मल्लाला मानाची चांदीची गदा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आली. या कुस्ती मैदानाच्या आयोजनात युवा नेते तथा नगरसेवक पै. महेश लोंढे यांनी विशेष भूमिका बजावली. नालेगावची कुस्ती परंपरा आणि नवोदित मल्लांना व्यासपीठ मिळावे, यासाठी त्यांनी मैदानाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. मैदान यशस्वीपणे पार पडल्यानंतर पै. महेश लोंढे यांनी उपस्थितांचे, मल्लांचे, पंचांचे तसेच आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. यापुढील काळातही कुस्ती क्षेत्राला आवश्यक ते सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शहरातील मल्लांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी दिले. मैदानातील विजयी मल्लांवर आयोजक आणि कुस्तीप्रेमींकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. विजयी मल्लांना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. उपविजयी मल्लांचाही रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. अनेक प्रेक्षकांनी विजयी मल्लांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना रोख रकमेची बक्षिसे दिली.
या मैदानासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून अनेक नामांकित मल्ल आणि वस्ताद मंडळी उपस्थित होती. कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. यात्रेसाठी आलेल्या महिला वर्गानेही आखाड्यातील कुस्त्यांचा आनंद घेतला. मल्लांच्या प्रत्येक डावाला आणि विजयी चितपटला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती. यावेळी ज्येष्ठ पैलवान तथा वस्ताद मारुती खंडागळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. मैदानात पंच म्हणून पै. संभाजी लोंढे, उपमहाराष्ट्र केसरी पै. अनिल गुंजाळ, पै. अर्जुन (देवा) शेळके, पै. बंडू शेळके, पै. सारंग वाघ, पै. युवराज करंजुले, पै. अजय म्हस्के आणि पै. दादा पांडूळे यांनी काम पाहिले.
मैदानाचे प्रभावी सूत्रसंचालन पै. हांगेश्वर धायगुडे यांनी केले. कुस्ती मैदान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयोजक अशोक घोडके, पै. सुनिल कदम, पै. मिलिंद जपे, बाळासाहेब भापकर, दत्ता ठाणगे, विजय शिंदे, पै. मयुर जपे, पै. आकाश घोडके, पै. ओम खंडागळे, पै. शुभम लोंढे, बबन रोहोकले, शिवाजी कदम, गणेश शेठ साळुंके तसेच हिंदुत्व प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
