बालघर प्रकल्पातील मुलांकडून खरेदी केले दिवाळीचे साहित्य
आर्थिक मदत देण्यापेक्षा वंचितांना सन्मानाने प्रोत्साहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित व निराधार मुलांची दिवाळी सन्मानाने साजरी होण्यासाठी या विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाश कंदिल, भेटकार्ड, रांगोळी, पणत्या आदी विविध साहित्य श्री सांदिपनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी खरेदी करुन त्यांची दिवाळी गोड केली. दुर्बल घटकांना आर्थिक मदत देण्यापेक्षा त्यांनी बनवलेल्या साहित्य खरेदी करुन त्यांची दिवाळी सन्मानाने साजरी करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी लागणारे विविध साहित्य बनवून त्याचे स्टॉल लावले होते. या विद्यार्थ्यांकडून सांदिपनी अकॅडमीत जेईई, नीट आदी स्पर्धा परीक्षांचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी विविध दिवाळीचे साहित्य खरेदी केले. तसेच या वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फळ व मिठाईचे वाटप करुन त्यांची दिवाळी गोड केली.
हा उपक्रम अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक के. बालराजू व बालघर प्रकल्पाचे युवराज गुंड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, अकॅडमीचे प्रा. नानासाहेब बारहाते, प्रा. अमित पुरोहित, प्रा. मनिष कुमार, राहुल गुजराल, अतिश काळे, सुधीर काळे, ज्ञानोबा फड, अॅड. जगताप, श्रीकांत भोस, अनुष्का शर्मा, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन सय्यद आदींसह अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते.
के. बालराजू म्हणाले की, विद्यार्थ्यांना सांदिपनी अकॅडमीत शिक्षणाबरोबर संस्कार देखील रुजवले जात आहे. सामाजिक जाणीवचे भान करुन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. स्वार्थी जीवन जगण्यापेक्षा सामाजिक कर्तव्याने जबाबदारी पार पाडण्याचे त्यांनी सांगितले. नावाजलेल्या मोठ्या शहराच्या धर्तीवर अहमदनगर शहरात परिपूर्ण गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण देण्याचे कार्य सांदिपनी अकॅडमी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी दिवाळी कशी साजरी करावी?, याचे उत्तम उदाहरण सांदिपनी अकॅडमीने समाजा समोर ठेवला आहे. दुर्बल घटकांना सन्मानाने आपली दिवाळी साजरी करता यावी या भावनेने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
