देवळालीतील अतिरिक्त कार्यभार काढण्याची मागणी; जवळपास 100 शेतकऱ्यांची मागणी
नियोजनशून्य कारभार, कामांमधील कथित अनियमितता आणि ब्रिटिशकालीन साहित्य विक्रीत अपहार केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जलसंपदा विभागाच्या देवळाली येथील अतिरिक्त कार्यभारावर असलेले शाखा अभियंता यांच्या कथित नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, शासकीय कामांमध्ये अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. कालव्यावरील कामांमध्ये एकाच ठिकाणी वारंवार कामे दाखवून शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याचा तसेच देवळाली व सोनगाव जलसंपदा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ब्रिटिशकालीन जुने साहित्य परस्पर विक्री करून शासकीय मालमत्तेचा अपहार केल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शाखा अभियंत्यांचा देवळाली येथील अतिरिक्त कार्यभार तातडीने काढून घ्यावा, अशी मागणी जवळपास 100 शेतकऱ्यांनी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शाखा अभियंता प्रमोद थोरात यांच्या अतिरिक्त कार्यभाराबाबत यापूर्वीही शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. त्यांच्या नियोजनशून्य कामकाजामुळे तसेच कथित अनियमिततेमुळे शासनाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार काढून घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, यापूर्वी तक्रार करूनही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मागील उन्हाळी आवर्तनादरम्यान उभ्या पिकांना पाणी देण्याबाबत योग्य नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पिकांना पाणी मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजनाचा अभाव आणि शाखा अभियंत्यांच्या कथित गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बीटमधील शेतकऱ्यांना पाणीवाटप, कालव्यावरील अडचणी आणि अन्य समस्या निर्माण झाल्यास संबंधित शाखा अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, ते कार्यालयात किंवा संबंधित बीटवर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी अडथळे येत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
कालवे आणि चाऱ्यांवरील दुरुस्ती व अन्य कामांसाठी शासनाच्या पोकलेन आणि जेसीबी यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. मात्र, एकाच ठिकाणी वारंवार तेच काम दाखवून शासकीय पैशांचा अपव्यय केला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचे मोजमाप, नोंदी आणि खर्चाची तपासणी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
या तक्रारीतील सर्वाधिक गंभीर मुद्दा म्हणजे देवळाली आणि सोनगाव जलसंपदा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील कालव्यांवरील जुने ब्रिटिशकालीन साहित्य गायब झाल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कालव्यावरील गेट, रॉड, राऊंड व्हील, मोठ्या लोखंडी प्लेट्स तसेच एस्केपचे मोठमोठे व्हॉल्व्ह अशा मोठ्या प्रमाणातील साहित्याची सुट्टीच्या दिवशी संबंधित शाखा अभियंता स्वतः उपस्थित राहून भंगार म्हणून विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या साहित्याची अंदाजे किंमत 8 ते 9 लाख रुपये असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या कथित साहित्य विक्रीप्रकरणामुळे देवळाली परिसरात नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली असून, शासकीय मालमत्तेची विक्री कोणाच्या परवानगीने करण्यात आली, त्यासाठी अधिकृत प्रक्रिया राबविण्यात आली होती का, साहित्याची नोंद आणि विक्रीचा हिशेब कुठे आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शाखा अभियंता यांच्या कामकाजाबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्या असताना ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या पाठीशी नेमके कोणाचे पाठबळ आहे, अशी चर्चाही परिसरात सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व तक्रारींची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, कालव्यावरील कामांच्या नोंदी आणि प्रत्यक्ष कामांची पडताळणी करावी, कथित साहित्य विक्रीप्रकरणाचा हिशेब तपासावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत यांच्याकडील देवळाली येथील अतिरिक्त कार्यभार काढून घ्यावा, अशीही मागणी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

