राज्यस्तरीय शालेय युनिफाईट मध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेल्या जिनत शेख हिचा विशेष सन्मान
डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी (एसएससी) बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 97.7 टक्के लागला. शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शनिवारी (दि.17 जून) सत्कार करण्यात येणार आहे.
शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम आलेली ज्ञानेश्वरी विजय भगत (80.60 टक्के), द्वितीय- निकीता विठ्ठल जाधव (77.60 टक्के), तृतीय- युवराज दत्तात्रय जाधव (72.40 टक्के) या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षिस देऊन सत्कार होणार आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय युनिफाईट क्रीडा स्पर्धेत गावातील खेळाडू जिनत शौकत शेख हिने 57 ते 59 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. प्रशिक्षक सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली युवक-युवती स्वसंरक्षणासाठी आवश्यक असलेल्या कराटेसह लाठी-काठी, तायक्वांदो व शिवकालीन मर्दानी खेळाचे थरारक प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.
नेहरु युवा केंद्र व नवनाथ युवा मंडळाच्या वतीने लाईन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी, युवक-युवतींना शासनाचे प्रमाणपत्र वितरीत केले जाणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.