शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत महापुरुष व प्रतिभावान व्यक्तींचे पुस्तके वाचनासाठी वाटप
पुरोगामी महाराष्ट्राचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी रचला -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, नेहरु युवा केंद्र व क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तर शालेय विद्यार्थ्यांना वार्षिक निकाल देऊन सुट्टी लागल्याने त्यांना महापुरुष व प्रतिभावान व्यक्तींच्या जीवनचरित्रावरील पुस्तके सुट्टीमध्ये वाचण्यासाठी देण्यात आली.
प्रारंभी शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, मंदा साळवे, तेजस केदारी, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे-ठाणगे, संतोष फलके, मच्छिंद्र जाधव, तुकाराम खळदकर, मंदाताई डोंगरे, लहानबा जाधव आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सामाजिक समतेची ज्योत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रज्वलीत केली. त्यांनी जातीय विषमता नष्ट करुन, सर्वांना समान संधी उपलब्ध करुन दिली. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करुन करुन दुर्बल घटकांना त्यांनी सर्वप्रथम आरक्षण दिले. पुरोगामी महाराष्ट्राचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी रचला. आजची पिढी मोबाईलमध्ये गुरफटली जात असताना त्यांना वाचनाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने महापुरुष व प्रतिभावान व्यक्तींच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी पुस्तके वाचण्यासाठी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.