भटके विमुक्त आदिवासी, पारधी समाजात कार्यशाळेच्या माध्यमातून बालविवाह आणि बालमजूर दुष्परिणामाची जागृती
अहमदनगर (प्रतिनिधी)- धोरणात्मक निर्णय कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. शासनाची अंमलबजावणी यंत्रणा प्रभावीपणे काम करण्यास कमी पडत आहेत. तर सामाजिक संस्थांचे जाळे तळागाळापर्यंत पोहोचले गेले असून त्यांचे परिणामकारक पद्धतीने कार्य सुरू आहे. या संस्थेवर मोठी जबाबदारी असून, समाजाने देखील त्यांच्यावर मोठे दायित्व सोपविलेले असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले.

क्राय वंचित विकास संस्था आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने बालविवाह आणि बालमजूर या विषयावर भटके विमुक्त आदिवासी, पारधी समाज बांधवांसाठी खंडाळा (ता. नगर) येथील केशर बाग फार्म हाऊस ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना न्यायाधीश पाटील बोलत होत्या. गट शिक्षणाधिकारी बाबुराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी वंचित विकास संस्थेचे सचिव राजेंद्र काळे, प्रकाश कदम, सोमनाथ वाळके, नंदा साळवे, मंदा कांबळे, कल्याणी साळुंके, प्रियंका जाधव, स्वाती नेटके, अनिल कांबळे, हसीना पठाण, स्वाती कुलांडे, कोमल शिंगाडे, सीमा जाधव, ज्ञानदेव वाघ, दिगंबर शेलार आदींसह वंचित विकास संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे न्यायाधीश पाटील यांनी बालविवाह, बालकामगार या प्रश्नावर त्यांच्या पालकांचे समुपदेशन करून परिवर्तन घडविण्याचे आवाहन केले तर बालविवाह कायद्याची माहिती दिली.
प्रास्ताविकात राजेंद्र काळे म्हणाले की, वंचित घटक असलेल्या आदिवासी, पारधी समाजामध्ये बालविवाह, बालकामगार हा गंभीर प्रश्न बनला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या सहकार्याने व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा व शासनाच्या कल्याणकारी योजनांचा दुर्बल घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु असून, अशा कार्यशाळेच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गट शिक्षणाधिकारी बाबुराव जाधव म्हणाले की, शिक्षणाने लगेच मुले अधिकारी होणार नाहीत, पण मात्र समाजात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. प्राथमिक शिक्षण संस्कृत समाजाची निर्मिती करत असते. सामाजिक क्रांती अचानकपणे होत नसून, त्याला कुठेतरी सुरुवात करावी लागते. शिक्षण हेच सामाजिक क्रांतीची प्राथमिक अवस्था असून, शिक्षणाने वंचित समाजात बदल घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेसाठी भटके विमुक्त आदिवासी, पारधी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.