• Thu. Mar 13th, 2025

धक्कादायक: ज्येष्ठ संपादक महेंद्र कुलकर्णी यांचे निधन

ByMirror

Dec 10, 2022

बहुआयामी पत्रकार हरपला

अहमदनगर (प्रतिनिधी)- दैनिक समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी यांचे शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. शनिवारी 10 डिसेंबरला नालेगाव अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.


गत 35 वर्षांपासून ते पत्रकारितेत कार्यरत होते. 1987 साली दैनिक लोकयुगपासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. लोकमत, लोकसत्तामध्ये दीर्घकाळ काम केल्यानंतर दैनिक समाचारचे मालक व संपादक म्हणून ते सध्या कार्यरत होते. धारदार व बहुआयामी पत्रकारिता हे त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य होते. त्यांना उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल अनेक पुरस्कार मिळाले होते. जिल्ह्याचा राजकिय आणि पाटपाणी प्रश्‍नाचा त्यांचा विशेष अभ्यास होता. त्यावर त्यांनी विपुल लिखाणही केले. त्यांचे या विषयावरील लेख आणि वृत्त मालिका गाजल्या आहेत.


मागील तीस-पस्तीस वर्षातील नगर शहरासह जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांचा त्यांचा विशेष अभ्यास असल्याने यावरील त्यांचे परखड लिखाण दिशादर्शक असायचे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पाठक रुग्णालयात पत्रकार व शहरातील राजकीय मान्यवरांनी धाव घेतली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. संग्राम जगताप यांनी हॉस्पीटल मध्ये येवून कुलकर्णी कुटुंबाचे सांत्वन केले. स्व. कुलकर्णी यांची अंत्ययात्रा मिस्कीनमळा येथून प्रारंभ होईल.

अंत्यविधी शनिवारी संध्याकाळी 5 वाजता नालेगाव अमरधाम येथे होणार आहे. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी स्वाती, मुली राधिका व मानसी, भाऊ सी. ए. ज्ञानेश कुलकर्णी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *